इस्लामाबाद, दि. ३१- वायव्य पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदूकधार्यांनी पुन्हा एकदा तीन हिंदू व्यापार्यांचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे. हिंदूंविरुद्धचे हे ताजे उदाहरण आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा या शहरापासून १४० किलोमीटरवरील एका गावातून या व्यापार्यांचे अपहरण झाले आहे, असे त्या देशातील एक्स्प्रेस ट्रिब्यून या दैनिकाने दिलेल्या बातमीत म्हटले.
या दैनिकानुसार अपहरण केलेल्या व्यापार्यांची नावे दिनेशकुमार, रीतेशकुमार आणि रतनकुमार अशी आहेत. हे तिघे एकाच कुटुंबातील आहेत. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सरकारला अपयश आल्यामुळे, नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येथील हिंदू पंचायतीने केलेल्या आवाहनानंतर एक दिवसाचा हरताळ पाळण्यात आला. या आंदोलनाला कृती समिती, व्यापारी संघटना आणि प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. परिवारातील एका कौटुंबिक कार्यक्रमानंतर घरी परत येत असतानाच त्यांचे अपहरण झाले.
प्रांताधिकारी अब्दुल रहीम यासंदर्भात म्हणाले, की कलात जिल्ह्यात हे हिंदू व्यापारी घरी परत जात असताना, त्यांचे वाहन काही अज्ञात लोकांनी बंदुकांच्या धाकाने अडविले आणि या तिघांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी अद्याप या तिघांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधलेला नाही. त्यांचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, रतनकुमार आणि अन्य दोघांचे अपहरण खंडणीसाठीच करण्यात आल्याचा दावा, त्यांचे बंधू मुकेशकुमार यांनी केला आहे. ते म्हणाले, की कुटुंबातील महिला याच वाहनात होत्या. खुजदार नावाच्या गावातील घरगुती कार्यक्रम आटोपून ते घरी जात होते. निघाल्यानंतर केवळ एका तासात त्यांचे अपहरण करण्यात आले.
मुकेशकुमार म्हणाले, की अपहरणकर्त्यांनी वाहनचालकाला खाली उतरण्यास भाग पाडले आणि स्वत: ते चालवत घेऊन गेले. नंतर सुराब या भागात त्यांचे वाहन सोडून दिलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेच्या विरोधात कलातमध्ये व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली आणि उत्स्फूर्तपणे हरताळमध्ये सहभागी झाले.