लोकपाल मिळविल्याखेरीज मरण नाही: अण्णा हजारे

नवी दिल्ली: लोकपालच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे दि. २५ पासून उपोषणाला बसलेले टीम अण्णाचे सदस्य गोपाल राय यांचीही प्रकृती ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी ‘करो या मरो’ची वेळ येऊन ठेपल्याचा इशारा दिला आहे तर लोकपाल मिळवून दिल्याखेरीज जनता मला मृत्यू येऊ देणार नाही; असे उद्गार अण्णांनी काढले आहेत.

लोकपालच्या मागणीसाठी दि.२५ पासून टीम अण्णाचे सदस्य केजरीवाल, राय आणि मनीष सिसोदिया हे उपोषणाला बसले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव सहकाऱ्यांचा विरोध असतानाही रविवारपासून अण्णांनीही उपोषण सुरू केले आहे. मात्र सोमवारी त्यांची प्रकृती बिघडली. वारंवार उपोषणे केल्यामुळेच त्यांची प्रकृती नाजूक झाल्याचे वैद्यक तज्ज्ञांनी सांगितले.

राय यांच्या शरीरात किटोनचे प्रमाण वाढल्याने त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. ते लवकरच उपोषण मागे घेतील असा कयास आहे.