चेन्नई दि.३० – दिल्लीहून चेन्नईला जाणार्या तमीळनाडू एक्स्प्रेसला आज म्हणजे सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत किमान ३५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून किमान २५ प्रवासी जखमी झाले आहेत. नेल्लोर स्टेशनवरून ही गाडी सुटल्यानंतर एस टू डब्यातील स्वच्छतागृहाच्या जागेत शॉर्ट सर्कीट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून पहाटेची वेळ असल्याने अनेक प्रवासी झोपेतच होते. गाडी ११० किमीच्या वेगाने जात असल्याने वार्याने आग वेगाने पसरली व त्यामुळे प्रवाशांना सुटका करून घेण्याची संधी मिळाली नाही असे सांगण्यात आले आहे.
या डब्यातून ७२ प्रवासी प्रवास करत होते. पहाटेच डब्यातून धूर येत असल्याचे कांही जणांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी दुसर्या डब्यात प्रवेश केला मात्र आग फारच वेगाने पसरल्याने वरच्या बर्थवर झोपलेले प्रवासी गुदमरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला असे दिसून येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २० प्रवाशानी गाडीतून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने गाडी थांबवून आग प्रतिबंधक दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसही घटनास्थळी त्वरेने पोहोचले आणि सुटका कार्य सुरू करण्यात आले. मात्र गाडीची दारे पॅक झाल्याने ही दारे गॅसकटरच्या सहाय्याने कापावी लागली. त्यात वेळ गेल्याने मृत्युमुखी पडलेल्याची संख्या वाढली असेही समजते. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. आग लागलेली बोगी अन्य डब्यांपासून त्वरीत अलग करण्यात आल्याने आग दुसर्या डब्यांपर्यंत गेली नाही व त्यामुळे अधिक नुकसान टळले असे जिल्हाधिकारी श्रीधर यांनी सांगितले.