दहशतवाद्यांनी पोखरली भारत-पाक सीमा

जम्मू: भारतीय सीमेवरील कडेकोट बंदोबस्त भेदून शस्त्रास्त्र आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानातून भारतीय हद्दीत पाठविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढविली जात असून सांबा जिल्ह्यात सापडलेले भुयार हा त्यापैकीच एक प्रकार आहे; असे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारे सीमेच्या कुंपणाखालून आणखी काही भुयारे असण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जम्मूपासून ५५ किलोमीटर अंतरावर सांबा जिल्ह्यातील सीमेलगतच्या गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील जमीन अचानक खचली. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली असता केलेल्या पाहणीत जमिनीखालून भुयार खणल्याचे निदर्शनास आले. ३ फ़ूट उंच आणि तीन फूट रुंद असलेले हे भुयार सुमारे ५०० मीटर लांबीचे आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील कुंपणाखालून हे भुयार काढण्यात आले असून त्यात प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी पाईपची सुविधाही ठेवण्यात आली आहे.

शस्त्रास्त्र आणि दहशतवाद्यांच्या वाहतुकीसाठी हे भुयार खणण्यात आल्याचा जम्मू पोलिसांचा कयास आहे. या भुयाराचे काम अपूर्ण असल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी हे भुयार उघडकीला आल्याने स्वातंत्र्यदिनी घातपाताचा दहशतवाद्यांचा कट आहे काय याची छाननीही सुरक्षा दले आणि तपास यंत्रणा करणार आहेत.