नवी दिल्ली: अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील सशक्त लोकपालाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण रविवार सकाळपासून सुरू केले. अण्णांचा करिष्मा आणि रविवारची सुट्टी यामुळे सकाळपासूनच जंतरमंतरवर मोठ्या प्रमाणावर समर्थकांनी हजेरी लावली. सर्वसामान्य लोकांचा फारसा सहभाग नसल्याने काहीसे हिरमुसलेले आंदोलनाचे संयोजक या प्रतिसादामुळे सुखावले आहेत.
संसदेत सशक्त लोकपाल विधेयक संमत करावे; केंद्र सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या १५ कथित भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई व्हावी अशा मागण्यांसाठी टीम अण्णामधील ज्येष्ठ सदस्यांनी दि. २५ पासून जंतरमंतर येथे उपोषण सुरू केले आहे. सरकारला चार दिवसाची मुदत देऊनही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आपण उपोषण सुरू केल्याचे अण्णांनी सांगितले. लोकपालाच्या मागणीसाठी अण्णांचे हे तिसरे उपोषण आहे.
टीम अण्णाला दि.८ ओगस्ट पर्यंत उपोषणाला परवानगी देण्यात आली आहे. त्या दिवशी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत सरकार आणि टीम अण्णा नेमकी काय भूमिका घेणार याबाबत सर्वसामान्य जनतेत उत्सुकता आहे.