केरळ. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले भारतातील एक राज्य.गॉडस ओन कंट्री म्हणविल्या जाणार्या या राज्याच्या पूर्वेला आहे पश्चिम घाट, पश्चिमेला अरबी समुद्र. नारळाची असंख्य झाडे, विपुल वनसंपदा, आणि साथीला सतत समुद्राची संगत असलेले हे राज्य. कोची किवा कोचीन हे शहर म्हणजे गेटवे ऑफ केरळ. या शहरावर अरब, चीनी, डच,ब्रिटीश आणि पोर्तुगीजांनी आपला ठसा उमटविला आहे. कोचीन अनेक वर्षे व्यावसायिक आणि औद्योगिक राजधानी म्हणूनही प्रसिद्ध होते. भारताच्या पश्चिम किनार्यावरील मुंबईनंतर आता कोचीन हे दुसरे महत्त्वाचे शहर आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे, रस्त्यांनी देशाच्या अन्य भागाला जोडलेले हे महत्त्वाचे बंदरही आहे.

समशीतोष्ण हवामान असलेल्या या शहरात समुद्र, डोंगर आणि जंगले या सार्यांचाच अनुभव घेता येतो. कोची हे मुख्य गांव सुरवातीला अगदी छोटे होते. मात्र आता फोर्ट कोची, मट्टनचेरी, एर्नाकुलम व आसपासची अनेक खेडी आणि गांवे एकत्र येऊन हे मोठे शहर बनले आहे. केरळ राज्याची सुरवातच या शहरापासून होते.वर्ल्ड टॅव्हल टूरिझम कौन्सिलने तीन टॉप पर्यटनस्थळांत याची नोंद केली असून हे शहर व्यापार, मासेमारी, जड उद्योग आणि आयटी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

एकदा कोचीला पोहोचलो की शक्यतो रस्ते न वापरता फेरी बोटींचा प्रवास करण्यासारखे दुसरे सुख नाही. आसपास असलेल्या छोट्या छोटया बंदरांवर या बोटीतून येजा करताना फार मजा येते. फोर्ट कोचीला पाहायची चिनी फिशिंग नेटस. चीन नंतर ही जाळी जगात फक्त कोचीलाच पाहायला मिळतात. चीनी सम्राट कुबलाईखान याच्या दरबारातील व्यापारी कोचीला आले तेव्हा त्यांनी ही जाळी येथे आणली. ही जाळी म्हणजे येथील कोळ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. फोर्ट कोचीच्या बीचवर सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा आणि दूरवर जाणारी जहाजे न्याहाळत राहायचे हा मस्त टाईमपास होतो. किनार्यावर असलेले युरोपियन स्टाईलचे बंगले, पारंपारिक खाद्यपदार्थ विकणार्या रस्त्याकडेच्या छोट्या छोट्या टपर्या या आनंदात आणखी भर टाकतात.

फोर्ट कोचीवरचे सेंट फ्रान्सिस चर्च जुने युरोपियन चर्च आहे. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा केरळच्या तिसर्या सफरीत येथेच आजारी पडला आणि मरण पावला. त्याचे थडगे येथेच आहे. अर्थात वास्को द गामाचे अवशेष नंतर परत पोर्तुगालला नेले गेले. रोझ रोडवरचे वास्को हाऊस हे येथील सर्वात जुने पोर्तुगीज घर.

मटनचेरी हे असेच दुसरे छोटे बंदर. बोटीतून येथे उतरायचे आणि ज्यू टाऊन कसे असते याचा अनुभव घ्यायचा. ज्युईश सिनेगॉगला भेट आवश्यकच. कारण १५६८ साली बांधलेल्या या सिनेगॉगमध्ये आहेत अप्रतिम चायनीज टाईल्स, बेल्जियम झुंबरे. ओल्ड टेस्टामेंट येथेच आहे असेही सांगतात. येथून जवळ असलेल्या डच पॅलेसलाही भेट हवीच. हा मुळचा पोर्तुगीज पॅलेस १७ व्या शतकांत डचांनी सुधारणा करून राजा ऑफ कोचीला भेट म्हणून दिला. अनेक राजांचे राज्याभिषेक येथे झाले आहेत. येथे महाभारत, रामायणातील प्रसंगावरची सुंदर म्युरल्स आहेत.

त्रिपुनीथुरा हा कोचीनच्या राजाने १९ व्या शतकात बांधलेला हिल पॅलेस आता म्युझियम मध्ये रूपांतरीत केला आहे. येथे असलेले सिंहासन, राजांचे मुकुट, जुन्या मौल्यवान दुर्मिळ वस्तू यावरून राजाच्या वैभवाची कल्पना येते. हा पॅलेस कोचीनपासून १६ किमीवर आहे. कोचीनला एक दोन मुक्काम तरी हवेतच. केरळच्या खास पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आणि खरेदीसाठी मेन रोड गाठायचा. भारतात बहुदा सर्वात मोठा सराफी बाजार येथेच असावा. अक्षरशः चार चार मजली भव्य दुकानातून असंख्य दागिन्यांची सजावट केलेली असते. कोचीनमधील घरटी एक माणूस गल्फमध्ये आहे असे सांगतात. येथे लग्नात मुलीला किलोच्या हिशोबाने सोने घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोन्याची मोठी उलाढाल येथे होते.

कोचीन प्रसिद्ध आहे मसाल्याच्या पदार्थांसाठीही. अर्थात केरळमध्ये सर्वच ठिकाणी हे मसाले मिळतात. पण कोचीनला मोठमोठी गोदामेच आहेत. लवंगा, वेलदोडे, मिरी, जायफळ, दालचिनी असे असंख्य मसाल्याचे पदार्थ. दुसरी खरेदी करायची ती साड्यांची. कोचीला चार चार मजली प्रचंड दुकाने या रेशमी साड्यांनी अक्षरशः तुडुंब भरलेली आहेत. अन्य ठिकाणांपेक्षा येथे साडी खरेदी स्वस्तात होते. सिल्कचा कपडाही उत्तम मिळतो.केरळ हिंडण्यासाठी पहिला मुक्काम कोचीलाच करावा लागतो. येथून अन्य ठिकाणी जाता येते त्यासाठी बस, स्वतंत्र टॅक्सी उपलब्ध आहेत. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेतच.