
नालंदा दि.२५- जगातील सर्वात जुने आणि नावाजलेले विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार्या नालंदा विद्यापीठाचे शेकडो वर्षांनंतर पुन्हा पुनर्निमाण करण्यात आले असून पुढच्या वर्षीपासून येथील शिक्षणक्रम सुरू होत आहेत.

नालंदा दि.२५- जगातील सर्वात जुने आणि नावाजलेले विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार्या नालंदा विद्यापीठाचे शेकडो वर्षांनंतर पुन्हा पुनर्निमाण करण्यात आले असून पुढच्या वर्षीपासून येथील शिक्षणक्रम सुरू होत आहेत.
भारत जगातील वैभवशाली राष्ट्र म्हणून जेव्हा ओळखला जात होता, त्या काळात म्हणजे ८०० वर्षांपूर्वी देश विदेशातून नालंदा आणि तक्षशीला या भारतीय विद्यापीठातून अध्ययन करण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असत. बिहार राज्यातील नालंदा विद्यापीठाची कीर्ती जगभरात दुमदुमत होती. मात्र कालाच्या ओघात सारे नष्ट झाले. आता पुन्हा एकदा नालंदा पहिल्याच दिमाखात सुरू होत असून यावेळी ते सर्वार्थाने विश्वविद्यापीठ म्हणूनच ओळखले जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा हा सर्वात आवडता आणि अधिक प्राधान्य दिला गेलेला प्रकल्प. जगभरातील विद्वान आणि विद्यार्थी या विद्यापीठाकडे आकर्षित होतील या पद्धतीनेच त्याची स्थापना केली जात आहे.
भारत, चीन, जपान, थायलंड, सिगापूर अशा अनेक देशांनी या विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केली असून या प्रकारे उभारले जात असलेले हे आशियातील पहिलेच विद्यापीठ आहे. विज्ञान, फिलॉसॉफी, अध्यात्म, आंतर राष्ट्रीय नातेसंबंध असे सात विभाग या विद्यापीठात असणार आहेत. नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अमर्त्य सेन यांची गेल्याच आठवड्यात या विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी राष्ट्र पती कलाम हेही या विद्यापीठाशी संबंधित होते मात्र कलाम आणि सेन यांच्यात कांही मतभिन्नता झाल्याने कलाम या प्रकल्पातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ.सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षापासून येथे हिस्टॉरिकल स्टडीज आणि स्कूल ऑफ इकॉलॉजी असे दोन विभाग सुरू करण्यात येत असून प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे असेही समजते.