पुण्यात व पश्चिम महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था हा विषय ऐरणीवरचा झाला आहे आणि त्याचे आज जेवढे गांभीर्य आहे, त्यापेक्षा तो अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दिवसा उजेडात सोन्या-चांदीच्या दुकानावर दहा-दहा मिनिटांचे दरोडे पडून काही कोटी रुपयांचे ऐवज पळवून नेणे, हा तर या भागातील वारंवार घडणारा प्रकार झाला आहे.
महिलांच्या अंगावरील दागिने पळविणे हा आता बातम्यांचाही विषय राहिलेला नाही. त्याही पेक्षा खाणीचे डोंगरच्या डोंगर पळविणे, नदीच्या पात्रातील दहा-दहा किमी अंतरातील वाळू पळवून नेणे याच्या जोडीला पाणी पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या जी गुन्हेगारीचे स्वरुप आहे ते अधिक गंभीर होण्याची शक्यता वाटण्याचे कारण म्हणजे मोसमी पावसाच्या एकशेवीस दिवसापैकी पन्नास दिवस कोरडे गेले आहेत. पाच टक्के जमिनीवरही पेरण्या झालेल्या नाहीत. ती वस्तुस्थिती पाहिली तर यापूर्वी १९७२, १९८६ चे दुष्काळ यापेक्षाही सध्याची परिस्थिती गंभीर आहे. यापुढे पाऊस पडून सरासरी गाठली गेली तर ठीक आहे नाही, तर यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता दुष्काळानंतरच्या वर्षात बेरोजगारीची संख्या फार वाढते आणि त्याचे पर्यवसान गुन्हेगारी वाढण्यात होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याबाबत काळजी करण्याची अजून दोन मोठी कारणे आहेत ती कारणे गुन्हा होण्याशी किंवा पोलीसांच्या तपासाशी संबंधित नाहीत पण न्यायालयात गेलेल्या गुन्ह्याच्या तपासात संशयाचा फायदा घेऊन किंवा पुरेशा पुराव्याचा अभाव म्हणून आरोपीचा गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण फार खाली आले आहे. सर्वसाधारण असे मानले जाते की, जेवढे खटले न्यायालयात जातात त्यापैकी सत्तर टक्क्यापर्यंत गुन्ह्यात आरोप सिद्ध व्हावा व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी पण नव्या उपलब्ध आकडेवारीनुसार पुणे शहरात वा पश्चिम महाराष्ट्रातच काय, पण महाराष्ट्रातही ९२ टक्के आरोपी मोकाट सुटत आहेत. गुन्हा सिद्ध होऊनही शिक्षा होण्याचे प्रमाण आठ टक्के आहे.
ही जशी नाराजीची बाजू आहे त्याप्रमाणे दिलासा देणार्याही कांही घटना आहे. त्यातील महत्वाची घटना म्हणजे गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका तरी टोळीला पुणे पोलीस दररोज ताब्यात घेत आहेत. गुन्ह्याच्या आधीच जेंव्हा पोलीस गुन्हेगारांना ताब्यात घेतात गुन्हेगारांच्या अन्य टोळ्यांचे दरोडे व हल्ले यांचे मनोबल घटते. गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास उपयोगी अशी दुसरी घटना म्हणजे पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याची शक्यता वाढली आहे. जेथे खंडपीठ असते तेथे शासकीय यंत्रणेवर एक जरब असते त्यामुळे तपासाला गती द्यावी लागते. त्याचा परिणाम पूरकच होत असतो.
यातील काही गुन्हेगारी तर अगम्य आहे ती म्हणजे धरणातील पाणीच पळविले जात आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या पानशेत, वरसगाव या धरणातील दोन टीएमसी पाणी यावर्षी चोरीला गेले आहे. वरसगाव धरणाच्या पर्जन्य क्षेत्रात लवासासारखी छोटीमोठी उपनगरे वाढण्याचे प्रमाण फारच वाढले आहे ती उपनगरे छोट्या छोट्या नद्यांना बंधारे घालून पाणी पळवतच असतात. पण यावर्षी पुण्याला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, टेमघर, पानशेत व खडकवासला या धरणात येऊन पोहोचलेल्या पाण्यापैकी दो टीएमसी पाण्याचा हिशोब लागलेला नाही. एक टीएमसी पाणी म्हणजे एक अब्ज घनफूट पाणी. पुणे शहराला एका महिन्याला सध्या सव्वा टीएमसी पाणी लागते. या चारही धरणांची क्षमता २९ टीएमसीची आहे. गेल्या वर्षी ती धरणे भरली होती वर्षभरात उन्हाने वाफ होण्याचे प्रमाण ठरलेले असते त्याही पेक्षा दोन टीएमसीचा हिशोब लागेनासा झाला आहे. धरणाच्या कालव्यातून शेतापर्यंत अधिकृतपणे पाणी पोहोचण्याच्या आधीच हे पाणी अन्य ठिकाणी वळविले जात असावे हीच शंका आकार घेताना दिसते आहे. सध्या पुणे परिसरात जागेला सोन्याचे भाव आले आहेत. पुणे शहर हे चारही बाजूनी डोंगरांनी वेढले आहे. या डोंगरावर घरबांधणी करायला बंदी आहे पण ते डोंगरच बेपत्ता झाले तर तेथे होणारी घरबांधणी ही जमिनीवरील बांधकामात मोडते व कालांतराने ती दंड भरून नियमित करून घेता येते. असे बांधकाम नियमित करण्याचे संकेत नुकतेच विधीमंडळात देण्यात आले आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे संदर्भ दररोज बदलून जात आहेत. गेल्या चार पाच वर्षात म्हणजे अमेरिकेत काम करणार्या भारतीय आयटी तज्ञांची संख्या कमी व्हायला लागल्यापासून तीच कामे तेथे होण्याऐवजी कमी खर्चात पुण्यात होत आहेत. त्यामुळे अमेरिकेत तीन लाख रुपये पगाराऐवजी पुण्यात एक लाख रुपये पगारात तेच काम होत आहे. अशी कामे करून देणार्या कंपन्यांची संख्या पुण्यात काही हजार आहे. आणि त्यात काम करणार्या आयटीतंत्रज्ञांची संख्याही दोन अडीच लाख आहे. ही काम करणारी मंडळी प्रामुख्याने तरुण आहेत व मुलींची संख्या अधिक आहे. अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून आलेल्या या लोकांना ज्या निवासाच्या व दळणवळणाच्या सेवा लागतात, त्यातून अव्वाच्या सव्वा वसुली व त्यांना लुटणे हा शहरातील गुन्हेगारीचा मोठा प्रकार आहे. या पैशामुळे शहराची जीवनशैलीच बदलून गेली आहे. यातून निर्माण होणारी घरबांधणीची आवश्यकता व त्यातून बांधकाम व्यवसायातील गुन्हेगारी ही काही एकट्या पुण्याचा विषय नाही. पण येथे गरज अधिक असल्याने त्याचे प्रमाण अधिक आहे.
गुन्हे घडण्याचे प्रमाण व गुन्हे नोंदले जाण्याचे प्रमाण न्यायालयात शिक्षा होण्याच्या प्रमाणाशी निवडीत असते. हे प्रमाण येथे फार कमी झाले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती येरवडा कारगृहात अंडासेलमध्ये अतिमहत्वाच्या पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्याचा जर खून होतो, तर मग सुरक्षित अशी जागाच कोणती शिल्लक नाही. गुन्हे घडण्याचे प्रमाण आणि शिक्षा होण्याचे प्रमाण हे बिहार, उत्तरप्रदेश व राजस्थानपेक्षा कमी झाले आहे. एका बाजूला बिहारमधील कायदा व्यवस्था सुधारत असल्याच्या बातम्या येत आहेत, तर दुसर्या बाजूला महाराष्ट्रासारख्या प्रथमपासून आघाडीवर असलेल्या राज्यात गुन्हेगार मोकाट राहात असल्याची वस्तुस्थिती होत आहे. या सार्या पार्श्वभूमीवर पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे महत्वाचे आहे. वास्तविक एका मूळ पीठापासून वा एका खंडपीठापासून दुसरे खंडपीठ अडीचशे किमी अंतरात असू नये असा नियम आहे पण देशात काही ठिकाणी तो नियम बाजूला ठेवला गेला आहे. कोल्हापूरला हे खंडपीठ झाले तर ती जागा गोवा खंडपीठापासून अडीचशे किमी अंतरात येते व पुणे हे मुंबईपासून अडीचशे किमी अंतरात येते. पण पुण्यावरून दररोज दोन डेक्कन क्वीन भरतील येवढ्या प्रमाणात अशील व वकील मुंबईला हायकोर्टात जात असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून मुंबई हायकोर्ट व केंद्र शासन यांनी पुणे येथे खंडपीठाला हिरवा दिवा दाखवल्याचे वृत्त आहे. ही स्थिती प्रत्यक्षात आली तर पुण्याचे स्वरुप बदलण्यास अजून एक कारण होणार आहे. यातील गंमतीची एक बातमी या आठवड्यात मुंबईतील उच्च न्यायालयातील वकिलांनी निदर्शनास आणून दिली. त्याचा उल्लेख येथे करणे अयोग्य ठरणार नाही ती बातमी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयातील एकूण वकिलांपैकी निम्मे वकील हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. पांडुरंगाच्या आणि स्वामी समर्थांच्या जिल्हयात ही कायद्याचे विवेचन करण्याची आवड कशी निर्माण झाली ही स्वतंत्र विषय आहे. पण या मंडळींचीही आता सोय होईल असे मानण्यास हरकत नाही.
यातील चिंतेचा भाग असा की, निरनिराळ्या प्रकारच्या बदलत्या गुन्हेगारीने पुण्याचे जनजीवन असुरक्षित जाणवू लागले आहे. येथील संसदेतील लोकप्रतिनिधीच जर जागतिक घटनेशी संबंधित असतील व त्या आरोपाखाली तेही आठ-नऊ महिने तिहारमध्ये राहून आले असतील, तर अन्य लोकांच्या सुरक्षेबाबत चिंताच केलेली बरी.