नुकत्याच झालेल्या श्रीलंकेसोबतच्या सामन्यात विराटने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या शतकामुळेच या सामन्यात टीम इंडियाला पुन्हा एकदा विजय मिळवता आला. त्यासोबत विराटने सलग पाच सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करण्याच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तर त्या पाच सामन्यापैकी चार सामन्यात शतक झळकावीत विराटने सचिनला मागे टाकले आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरने १९९४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ६२ धावा तर त्यानंतर वेस्टइंडीज सोबतच्या मालिकेत ६६, ५४, ८८ आणि १०५ धावा केल्या होत्या. त्या विक्रमाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. त्याने काही दिवसापूर्वीच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरूद्ध १३३, १०८ बांगलादेशविरूद्ध ६६ व पाकिस्तानविरूद्ध १८३ तर शनिवारी श्रीलंकेविरूद्ध खेळताना १०६ धावा केल्या. सलग पाच सामन्यात त्याने ५० पेक्षा अधिक धावा केल्या. सचिनच्या विक्रमाची बरोबरी साधतानाच विराटने पाच सामन्यापैकी चार सामन्यात शतक झळकाविताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
यापूर्वी विराटने २०१० साली सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियासोबत ११८ धावा केल्या तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १०५, ६४ व ६३ धावा केल्या होत्या. आतापर्यंत ८६ सामन्यात विराटने १२ शतके झळकावली आहेत. तर २०१२ साली त्याने आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत.