मराठी चित्रपटसृष्टीत प्रयोगशील दिग्दर्शकांमध्ये प्राधान्याने नाव येते सतिश राजवाडे. ‘मृगजळ’, ‘गैर’, ‘मुंबई – पुणे – मुंबई’ या प्रत्येक चित्रपटाची हाताळणी सतिशने सक्षमपणे केलेली आहे. ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाटकावरून त्याने ‘बदाम, राणी, गुलाम, चोर’ हा चित्रपट आपल्या भेटीला आणला आहे.
आपल्या भेटीला येत आहे ‘बदाम, राणी, गुलाम, चोर’
‘बदाम, राणी, गुलाम, चोर’ ही गोष्ट तीन मित्रांची आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, त्यांच्या स्वभावानुसार या तिघांचीही टोपणनावं आहेत. यातल्या चाकू (उपेंद्र लिमये) गॅरेज चालवतो. पुस्तक (पुष्कर श्रोत्री) प्राध्यापक आहे आणि माकड (आनंद इंगळे) हा एका न्यूज चॅनलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. चाकूचं एका मुलीवर प्रेम आहे.
या मित्रांची ओळख करून देण्यासाठी त्या मुलीला त्याने घरी बोलावलंय. ती घरी येते त्यावेळी टोपननावांची ओळख होते. मग ती स्वःतच नाव ‘पेन्सिल’ असल्याचे सांगते. या चौघांचा आधार घेत कौटुबिक नातेसंबंधांच्या माध्यमातून राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. पेन्सिल, चाकू आणि पुस्तक यांच्यात वाद निर्माण होतात. या प्रेम त्रिकोणात माकड मध्यस्थी करतो. पेन्सिल नेमकी कुणाला मिळते हे जाणून घेण्यासाठी या चौघांची भेट घ्यायलाच हवी.
लेखकाने चौघांची मैत्री आणि राजकीय घटनाक्रम यांची घातलेली सांगड अप्रतिम आहे. एका दर्जेदार कथेला तितक्याच दर्जेदार संवादांनी गुंफण्यात आलं आहे. दैनंदिन जगण्यातलं राजकारण दाखवताना त्यांनी कोणताही आव आणलेला नाही. अत्यंत साध्या, सोप्या संवादांमुळे हास्यनिर्माण होते. ‘बौद्धिकदृष्ट्या सामान्य पुरुषाने असामान्य बुद्धीमत्तेच्या स्त्रीशी विवाह करू नये, तो होणार्या मुलांवर अन्याय असतो’, ‘आपल्याकडे किरकोळ कारणावरूनच घटस्फोट होतात, बेडरुममध्ये घडणार्या घडामोडींमुळे घटस्फोट घेण्याची पद्धत नाहीये अजून आपल्याकडे’, ‘जिथे सरकार, विरोधक आणि जनता असेल, तिथे शांतता किती काळ असणार’ अशा संवादांमधून मानवी स्वभाव दाखवला आहे. कथा, पटकथा खूप सुटसुटीत असल्यामुळे तो विचार पोहोचवण्यासाठी दिग्दर्शकाला चौकटीपलिकडे जाण्याची गरज भासत नाही. मात्र, त्यामुळे हा चित्रपट केवळ चर्चा आणि संवाद अशा स्वरूपाचा ठरतो. नाटकाच्या प्लॉटवर चित्रपट बनवताना दिग्दर्शकाला बरीच बंधनं येतात कदाचित त्यामुळेच प्रेक्षकांचं लक्ष खिळवून ठेवण्यासाठी त्याने क्लोजअप्स शॉटवर सर्वाधिक भर दिला आहे.
चाकू आणि पुस्तकापेक्षा पेन्सिल आणि माकड यांना खूप व्हेरिएशन्स आहेत. मुक्ताने पेन्सिलचा बिनधास्तपणा, फस्ट्रेशन आणि शेवटी आलेली हतबलता समजुतीने रेखाटली आहे. चाकू व पुस्तक यांची मध्यस्थी करताना उडालेली तारांबळ, प्रत्येकाला आपली बाजू पटवून देताना त्याने दाखवलेले भाव आनंद इंगळेने माकडाच्या भूमीकेतून सहजपणे साकारले आहेत. नाटकाध्ये कलाकार प्रेक्षकांशी थेट संवाद साधतात. त्यामुळे नाट्यकृतीतून मिळणारा आनंद खूप वरचा असतो. तो आनंद प्रेक्षकांना मिळावा म्हणूनच दिग्दर्शकाने कलाकारांच्या चेहर्यावर लक्ष केंद्रित केलं असावं. परंतु त्यामुळे कॅमेरावर्कला फारसा वाव मिळालेला नाही.
चौघांच्या बदलत्या नात्याप्रमाणे येणारा राजकीय घटनाक्रम नाटकाप्रमाणे जशासतसा दिग्दर्शकाने वापरला आहे. कलाकारांची निवड अचूक आहे यात शंकाच नाही. कथा, पटकथेला मिळालेली संवादाची जोड, सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय या जमेच्या बाजू आहेत. संगीतकाराकडून यापेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा होती. नाटकामधून चित्रपटात परिवर्तित झालेल्या या शँपेनचा अस्वाद घ्यायला हवा.
चित्रपट – बदाम, राणी, गुलाम, चोर
निर्मिती – मनोहर एटरटेन्मेंट
दिग्दर्शक – सतीश राजवाडे
संगीत – सलील कुलकर्णी
कॅमेरा – सुरेश देशमाने
कलाकार – उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मुक्ता बर्वे, विनयआपटे, दीपक करंजीकर.
