गुजराथेतील हिताची प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी

अहमदाबाद दि.१९ – गुजराथच्या अहमदाबाद शहरापासून जवळच असलेल्या करणनगर भागात हिताची या कंपनीच्या प्रकल्पाला गुरूवारी सकाळी भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा सहा किलोमीटरवरूनही दिसत होत्या असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाचे २० बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. बराच काळ आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड जात होते. आगीत जिवीतहानी झाली अथवा नाही हे अद्यापी समजू शकलेले नाही.

प्राथमिक अंदाजानुसार या आगीत कंपनीचे किमान १०० कोटी रूपयांचे नुकसान झाले असून प्रकल्पाचा ६० ते ७० टक्के भाग आगीत जळून राख झाला आहे असे समजते.