भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळणे झाले सोपे

मुंबई, दि. १९ – अमेरिकेत जाण्याची इच्छा असणार्‍या भारतीयांसाठी दिलासा देणारी घोषणा झाली आहे. भारतीय पर्यटकांसाठी आणि व्यापार्‍यांसाठी अमेरिकेने व्हिसाच्या अटी शिथिल केल्या आहेत. वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या एका कार्यक्रमात अमेरिकन दूतावासाच्या अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

सात वर्षाखालील मुलांना या पुढे अनिवासी व्हिसासाठी मुलाखत द्यावी लागणार नाही. त्यांना फक्त अर्ज भरावा लागणार आहे. तसेच कोणत्याही कारणामुळे व्हिसा मिळण्यास वेळ लागला, तर भारतीय अर्जदारास अतिरिक्त व्हिसा फी द्यावी लागणार नाही.

मुंबईत अमेरिकेच्या दूतावासातर्फे व्हिसा देण्यासाठी ४० केंद्र सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांचे व्हिसा केंद्रातले काम अल्पावधीत होईल. अनपेक्षितपणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत व्हिसा हवा असल्यास इ-मेलमार्फत अर्ज करता येणार आहे.