पुणे, दि. १९ – अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत; मात्र भांडवलदारांनी लोकशाही हायजॅक केल्याने सामान्य माणूस शिक्षणापासून दुरावत चालला आहे. ही स्थिती गंभीर आहे. आज शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावरील संघर्ष करण्याची गरज आहे, असे मत ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.
शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची गरज- लक्ष्मण माने
झोपडपट्टी सुरक्षा दल आणि श्री शिवशांताई प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘गोरगरिबांचे लढे रस्त्यावर करण्याची आवश्यकता आहे’ या विषयावरील चर्चेत माने बोलत होते. या चर्चेचे उद्घाटन म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रतनलाल सोनग्रा, जवाहर मुथा, इंजि. हेमराज फोन्सा, कालिदास कांबळे, भगवानराव वैराट, ऍड. गोरक्ष कांबळे, प्रवीण बारहाथे उपस्थित होते.
शिक्षणाची प्रेरणा ज्ञान असावी, रोजगार नव्हे, असे सांगताना माने म्हणाले, ‘‘शिक्षणामुळे माणसामध्ये परिवर्तन होते; मात्र गोरगरिबांची मुले शिकूच नयेत, असे धोरण राज्यकर्ते राबवित आहेत. आठवीपर्यंत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणे, हाही त्याच धोरणाचा एक भाग आहे. कारण सामान्य मुलगा आठवीपर्यंत गेला तरीही त्याला काही लिहिता-वाचता येत नाही, मग तो पुढील स्पर्धेत टिकणारच नाही.’’
महापुरुषांच्या नावाने फक्त दुकानदारी करण्याचे काम काही दलाल करत असल्याचे सांगत माने म्हणाले, ‘‘अण्णा भाऊ साठे यांनी जे लेखन केले. त्याचा उदो उदो करण्यात येतो; मात्र कॉम्रेड अण्णा भाऊंनी जे विचार मांडले त्याची अंमलबजावणी कोणीच करत नाही. गरिबांसाठी संघर्ष करण्याची कोणाचीही तयारी नाही. कोणतीही चळवळ वाढवायची असेल, संघर्ष करायचा असेल तर त्यासाठी का? कोणासाठी? कशा मार्गाने याच्या नियोजनाबरोबरच व्हिजन आणि धोरण आवश्यक असते.’’
काकडे म्हणाले, ‘‘लोकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, असे धोरण राबविण्याची आवश्यकता असते; मात्र असे होताना दिसत नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय आपला आवाज शासनदरबारी पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी आंदोलनाला विध्वंसक वळण लागणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी, याचबरोबर आपल्या नेत्यांचे हेतू लक्षात घेतले पाहिजेत.’’
सोनग्रा म्हणाले, ‘‘गरिबांचे लढे लढणारे नेतृत्व आज राहिले नाही. आंदोलनाची घोषणा करून उपोषणे करायची, हवेत पोट आत घेऊन दाखवायचे आणि त्याच वेळी आंदोलनाला दिशा देण्याऐवजी फक्त जेवणावळी उठवायच्या हे कोणत्या प्रकारचे लढे आहेत, याचे भान सामान्य माणसांनी ठेवायला हवे.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानराव वैराट यांनी केले.
