विजेचे दर वाढवा, तोटा कमी करा – अहलुवालियांचा सल्ला

नवी दिल्ली दि.१८- विजेचे दर वाढवा आणि  तोटा कमी करा, असा सल्ला नियोजन आयोगाचे अध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या अधिवेशनात ते पुढे म्हणतात की, विजेचे दर वाढवा आणि त्याच बरोबर पाणी, शिक्षण, आरोग्य यासाठी वापरल्या जाणार्‍या विजेवरील अनुदानात सुधारणा करा.

नियोजन आयोगाने म्हटले आहे की, विजेचे दर तर्कसंगत करून संकटात सापडलेल्या विद्युत क्षेत्राचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी निश्चित स्वरूपाचे प्रयत्न करावेत. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी विद्युत क्षेत्राचा विकास व प्रगती होणे अत्यंत आवश्यक आहे.जी राज्ये नियमीतपणे विजेच्या दरात वाढ करीत नाहीत, त्यांचा तोटा वाढत असल्याने त्यांना योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे, असे सांगून ते म्हणाले की, बहुसंख्य राज्यांनी गेल्या दहा वर्षांत एकदाही वीज दरवाढ केलेली नाही. आर्थिकदृष्या विद्युत क्षेत्र भक्कम पायावर उभे असणे आवश्यक आहे.

वीजेवरील अनुदान हे केवळ ठराविक वर्गासाठी आवश्यक आहे. राज्यांनी अनुदानाच्या नावावर सरकारी तिजोरी रिकामी करण्याचा सपाटा चालू ठेवू नये. या अनुदानाचा वापर पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या सारख्या क्षेत्रासाठी केला पाहिजे. कदाचित, याच कारणामुळे विद्युत क्षेत्रास दरवर्षी ७० हजार कोटी रुपयांचा तोटा होत आहे. वीजेचे दर वाढवून तोटा कमी करणे राज्यांच्या स्थैर्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.