जिहादी होत आहेत अय्याश!

नवी दिल्ली, दि. १६ – विविध स्तरांतील तरुणांना धार्मिक मूलतत्ववाद शिकवून त्यांना ‘जिहादी’ बनविण्याची दहशतवाद्यांची कार्यपद्धती आहे. मात्र, कालांतराने हे तरुण जिहाद आणि धर्मभावना विसरून दहशतवादी विचाराचा प्रसार आणि घातपाती कृत्यांसाठीचा पैसा अय्याशीवर उडवीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

विविध स्तरांतील युवकांचे कट्टर धार्मिक मूलतत्ववादी विचारांनी माथे भडकावून त्यांना अतिरेकी बनविण्याचे काम दहशतवादी संघटना करीत असतात. प्रशिक्षणानंतर संघटनेत जम बसल्यावर हेच युवक धर्म आणि जिहाद वगैरे विसरून केवळ पैशासाठी काम करणारे ‘भाडोत्री’ दहशतवादी बनतात. इतकेच नव्हे तर ते आपले ‘इमान’ विसरून एखाद्या घातपाती कामगिरीसाठी किंवा आपल्या विचाराच्या प्रसारासाठी सोपविण्यात आलेले पैसे वापरून ते मौजमजा करतात.

पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानिक गुंड शरद मोहोळ याच्याकडून हत्या झालेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी कातील सिद्दिकी याची चौकशी करताना ही बाब लक्षात आली आहे. घातपाती कृत्यांना स्थानिक लोकांकडून सहकार्य मिळविण्यासाठी त्याला संघटनेकडून १ लाख रुपये देण्यात आले. त्या पैशाचा वापर करून त्याने दोन मुलींबरोबर ‘ऐश’ केल्याचे पोलिसांना सांगितले. इंडियाना मुजाहिदीन किंवा कोणत्याही विचारधारेशी आपल्याला काही देणे घेणे नाही; असेही त्याने जबाबात सांगितले.

जर्मन बेकरी बॉंबस्फोट प्रकरणाचा सूत्रधार यासीन भटकळ हा तर मुजाहिदीन संघटनेतील एक महत्वाचा म्होरक्या! मात्र त्यानेही संघटनेच्या सदस्यांना कायदेशीर मदत मिळविण्यासाठी त्याला देण्यात आलेल्या निधीतील १४ लाख रुपये नालासोपारा येथील एका बांधकाम प्रकल्पात गुंतविल्याची माहितीही पुढे आली आहे. आपल्याला बांधकाम व्यवसायात मोठी गुंतवणूक करायची आहे; असे त्याने सांगितल्याचे अटकेत असलेल्या त्याच्या सहकार्यांनी पोलिसांना सांगितले आहे.