१०० वर्षे जुना बल्ब

लंडन, दि. १५ – सर्वसामान्यपणे बल्बचे आयुष्य १ हजार तासांचे असते. निदान ते तयार करणार्‍या कंपन्या तशी हमी देतात. भारतात मात्र विजेच्या दाबातील अनियमिततेमुळे लावल्या क्षणापासून कधीही तो `शॉट’ होऊ शकतो. एक हजार तास चालणारा बल्ब आपण कधीच पाहिलेला नाही.

मात्र, लंडनमधील एका घरापुढील व्हरांड्यात लावलेला बल्ब चक्क १०० वर्षांपासून तेवतोच आहे! एवढेच नाही, तर उत्तर कॅलिफोर्नियातील लिव्हरमोर येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयातील एका बल्बने गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव दाखल करण्यात आले आहे. या बल्बची निर्मिती १९०१ मध्ये झाली होती.

लंडनमधीलच डीसी ओसरम कंपनीमध्ये तयार झालेला २३० व्होल्ट, ५५ वॉट क्षमतेच्या या बल्बचे उत्पादन, जुलै १९१२ मध्ये झाले होते. सुप्रसिद्ध टायटॅनिक ही शाही प्रवासी बोट बुडाल्यानंतर काही महिन्यांनी हा बल्ब कंपनीतून बाहेर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.

रॉजर डायबॉल (वय ७४) यांच्या घराच्या व्हरांड्यात हा बल्ब बसविण्यात आला आहे. हा बल्ब अखंडपणे तेवतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डायबॉल हे लंडनमधील सफॉल्कमधील लोवेस्टॉफ्ट येथे राहतात. पत्नी पॅट्रिशिया यांच्यासह ते ४५ वर्षांपूर्वी या घरात राहण्यास आले, असे सन या दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

डायबॉल सांगतात, की १९६७ मध्ये आपण या घरात राहण्यासाठी आलो होतो. तेव्हापासूनच हा बल्ब मूळ जोडणीसह होता. उत्तर लंडनमधील वेम्बली येथे ओसरम-जीईसीचे मुख्यालय आहे. डायबॉल यांना या बल्बचे इतके कुतूहल होते, की त्यांनी कंपनीला पत्र पाठविले आणि त्यात बल्बचा अनुक्रमांक आणि अन्य तपशिल पाठविला. कंपनीने या अनुक्रमांकावरून शोध घेतला असता, तो शंभर वर्षांपूर्वी तयार करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबद्दल कंपनीतर्फे डायबॉल यांना खास प्रशस्तीपत्रही देण्यात आले.

अर्थात, डायबॉल यांच्या घरातील हा बल्ब काही सर्वात दीर्घकाळ तेवणारा नाही. यापेक्षाही जुना आणि चालू स्थितीतील बल्ब केंटमधील मारगेटमध्ये आढळला आहे. या बल्बचे उत्पादन १८९५ मध्ये झाले होते. विशेष म्हणजे कुशाग्र बुद्धीचे अमेरिकी संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांनी टंगस्टन तारेचा उपयोग करून बल्बचा शोध लावल्यानंतर, अवघ्या १५ वर्षांनंतर तो तयार झाला होता!