शासन, प्रशासनात महिलांच्या सहभागाने भ्रष्टाचाराला आळा – एलिसा आयर्स

चेन्नई, दि. १५ – भ्रष्टाचार ही जागतिक समस्या असून सर्वच देशांना या समस्येने ग्रासले आहे. मात्र शासन आणि प्रशासनात महिलांचा सहभाग वाढल्यास भ्रष्टाचाराला निश्चितपणे आळा बसतो, असा विश्वास अमेरिकेतील डीप्लोमेत एलिसा आयर्स यांनी व्यक्त केला.

चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारतातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही शांततापूर्ण क्रांती असल्याचे मत व्यक्त करून त्या म्हणाल्या की, पंचायत स्तरावरील राजकारण सशक्त होणे म्हणजे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाची पावतीच आहे. वर्ल्ड बँकेचे उदाहरण देत त्यांनी उच्च स्तरावर महिला असल्यास भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जगभरात एकूण संसद सदस्यांपैकी २० टक्के सदस्य महिला असून, २०५० सालापर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतात महिलांच्या राजकारणातील सक्रीयतेबद्दल समाधान व्यक्त करून आयर्स म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी भारताच्या दिल्ली, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांत मुख्यमंत्री पदावर महिला होत्या हे उल्लेखनीय आहे. केरळने आणखी एक पाऊल पुढे टाकून महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हे कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.