लैला खान या चित्रपट अभिनेत्रीचा खून होऊन १६ महिने उलटले आहेत आणि आता तिच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांना सापडला आहे. याचा अर्थ तिचा खून झाला होता असा होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र तिचा एकटीचा खून झालेला नाही. तिची आई, एक बहिण, एक चुलत बहिण, एक भाऊ आणि त्यांचा नोकर अशा पाच जणांचाही खून एकाच वेळी करण्यात आलेला आहे आणि त्यांचे मृतदेह घटनास्थळीच पुरून टाकण्यात आले आहेत.
काश्मीरमधील एक लाकूड व्यापारी परवेझ टाक याने स्वत:च आपण या सर्वांचा खून केला असल्याचे कबूल केले आहे आणि त्याच्याच सांगण्यावरून हे सांगाडे उकरून काढण्यात आले आहेत. याचा अर्थ परवेझ टाक याने दिलेली जबानी आणि दिलेली कबुली ही खरी आहे. त्याने लैला खानचा आणि तिच्या कुटुंबाचा हा खून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या लैला खान हिच्या फार्म हाऊसवरच केलेला आहे. परवेझ टाक याने लैला खानच्या आईशी विवाह केलेला होता. अशा प्रकारे तिचा आणि तिच्या कुटुंबाचा खून तिच्या सावत्र बापानेच केलेला आहे.
लैला खान ही मुळातली पाकिस्तानातली राहणारी असून, ती भारतात आलेली होती. परंतु ती भारतात कधी आली, कशी आली आणि का आली याची माहिती कोणीच देत नाही. तिचा जन्मदाता बाप नादिरशहा पटेल हा मुंबईत रहात आहे. परंतु लैलाच्या आईने त्याच्यापासून तलाक घेतला आणि परवेझ टाक याच्याशी निकाह लावला. परवेझ टाक हा काश्मीरमधला राहणारा तर आहेच, पण तो लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्यामुळे लैला खानच्या आईने परवेझबरोबर लग्न केल्यानंतर या माय-लेकीचा सुद्धा दहशतवादी संघटनांशी संबंध आला आणि त्यातूनच लैला खान, तिची आई आणि परवेझ टाक हे सगळे संशयाच्या भोवर्यात सापडले. लैला खान हिने राजेश खन्नाबरोबर एका चित्रपटात भूमिका केलेली होती. ती काही फार गाजली नाही, परंतु या चित्रपटामुळे तिला या हिंदी चित्रपटसृष्टीत अधिक कामे मिळायला लागतील अशी आशा वाटायला लागली. मात्र तिचे करिअर असे खुलायला लागले असतानाच २०११ च्या फेब्रुवारीमध्ये ती चमत्कारितरित्या बेपत्ता झाली आणि तिचे नेमके काय झाले याविषयी चर्चा सुरू झाली. काल इगतपुरीजवळ हे मृतदेहांचे सांगाडे सापडल्यामुळे तिच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य आता उलगडले आहे.
तिच्या बेपत्ता होण्याचे रहस्य उलगडले असले तरी तिच्या वागण्याविषयीचे आणि दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांविषयीचे गूढ मात्र कायमच राहिलेले आहे. तिचा हा खून खरे म्हणजे पचलेला होता. अगदी सहा जणांची हत्या होऊन सुद्धा ताकास तूर लागले नव्हते. मात्र परवेझ टाक याच्याजवळ एक वाहन सापडले आणि या वाहनाने सार्या रहस्याचा भेद झाला. हे वाहन परवेझच्या गॅरेजमध्ये पडलेले होते आणि ते परवेझच्या मालकीचे आहे असे काश्मीरमधले त्याचे शेजारी सांगत होते. पोलिसांनी हे वाहन जप्त केले तेव्हा त्याच्यावरच्या नंबरवरून ते वाहन मुंबईचे असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून पोलिसांनी मुंबईच्या पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा ही गाडी लैला खानच्या आईच्या मालकीची असल्याचे लक्षात आले. हीच गाडी दिल्लीतल्या एका बॉम्बस्फोटच्या प्रकरणात पोलिसांच्या नजरेस पडलेली होती. तेव्हा एका वाहनावरून आणि परवेझच्या लष्करी तोयबाशी असलेल्या संबंधावरून बरेच मोठे षड्यंत्र उघड झाले.
लैला खान आणि तिची आई यांचा लष्करे तोयबाशी संबंध होता हे यातून समजून चुकले. दरम्यानच्या काळात लैला खानने विवाह केलेला होता. तिच्या विवाहाविषयी सुद्धा दोन प्रकारची माहिती दिली जात आहे. तिचा विवाह बांगला देशातल्या एका दहशतवाद्याशी झाला होता असेही सांगण्यात येते आणि मुंबईतल्या एका हवाला रॅकेटियरशीही झाल्याचेही सांगण्यात येते.
यातला तिचा कोणता विवाह खरा होता याचा उलगडा अजून व्हायचा आहे. परंतु या दोन्ही विवाहांचा संबंध दहशतवाद्यांच्या जाळ्याशी जोडला गेला आहे. एकंदरीत लैला खान ही दहशतवाद्यांची हस्तक होती हे आता उघड झाले आहे. अशा प्रकारची दहशतवादी व्यक्ती भारतात येते, फ्लॅट खरेदी करते, फार्म हाऊस सुद्धा खरेदी करते आणि चित्रपटात भूमिका सुद्धा मिळवते. या सगळ्या गोष्टी करताना तिला तिचे पाकिस्तानी मूळ आडवे येत नाही. परदेशातल्या एका व्यक्तीला भारतामध्ये असे सारे व्यवहार सुखेनैव करता येतात यावरून भारताच्या सुरक्षा व्यवस्थातील गलथानपणावर चांगलाच प्रकाश पडतो. लैला खान आणि तिची आई पाकिस्तानातून येथे कशा आल्या? तिच्या आईचा नादिरशहा पटेल याच्याशी विवाह कसा झाला? तिला भारतात राहण्याचा परवाना दिला कोणी? या गोष्टीवर कोठेहे प्रकाश पडलेला आढळत नाही. तिच्याकडे दोन कोटी रुपयांचे दागिने होते, अशी एक माहिती पुढे आली आहे. पण हे दागिने आले कोठून, याचा कसलाच खुलासा होत नाही. भारत देश म्हणजे ‘आव जाव घर तुम्हारा’ झालेले आहे.