मुंबई दि.११ – पाकिस्तानने एक था टायगरच्या प्रोमोजवर घातलेल्या बंदीमुळे दिग्दर्शक कबीर खान आणि यशराज फिल्म्सपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परिणामी हा सिनेमा पाकिस्तानविरोधी नसल्याचे पाकिस्तान सरकारला पटवून देण्यासाठी दिग्दर्शक कबीर खान आणि खुद्द अभिनेता सलमान खान पाकिस्तानला जाणार आहेत.
पाकिस्तान इलेक्ट्रोनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथोरिटीने जारी केलेल्या पत्रानुसार कुठल्याही सॅटेलाइट चॅनेलला आणि केबल टीव्हीला पाकिस्तानात एक था टायगर सिनेमाचा कुठलाही प्रोमो दाखविता येणार नाही. १५ ऑगस्ट रोजी जभरात प्रदर्शित होणारा एक था टायगर हा सिनेमा रॉ आणि आयएसआय यांच्या कारवायांवर आधारित आहे.
या सिनेमामध्ये इंटर-स्टेट इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानच्या सरकारी संघटनेची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी केंद्र सरकारच्या सेंसॉर बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत एक था टायगरचा कुठलाही प्रोमो टीव्ही, रेडिओवरून प्रसारित करायचा नाही असा सरकारी हुकुम आहे.
याबद्दल टिवटरवर माहिती देताना कबीर खान यांनी मात्र या गोष्टीचा दोष पाकिस्तान सरकारला न देता काही प्रसिद्ध भारतीय सिनेमांना दिला आहे. बॉर्डर, गदर यांसारख्या चित्रपटांचे नाव न घेता कबीर खान म्हणाला, ’पाकिस्तानबद्दल आम्ही काहीच वाईट दाखवत नाही. या सिनेमांनी भारत- पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढवले. त्यामुळेच पाकिस्तान एक था टायगर तिथे रिलीज होऊ देत नाहीये. पण मी सलमानच्या पाकिस्तानी फॅन्सना आश्वासन देतो, की एक था टायगर पाकिस्तानातही त्याच दिवशी प्रदर्शित होईल, ज्या दिवशी जगात सगळीकडे होईल.’