नवी दिल्ली, दि. ११ – गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी वादग्रस्त विधान करत देशातील गरीब जनतेची थट्टा केली आहे. सर्वसामान्यांना १५ रुपयांची पाण्याची बाटली परवडते, २० रुपयाचे आईस्क्रीम परवडते, मग धान्याच्या किंमती वाढवल्यावर ओरड कशाला असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.
चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर भाजपने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. चिदंबरम यांनी हे विधान करुन सामान्य जनतेची थट्टा आणि अपमान केल्याचे भाजपने म्हटले आहे.
चिदंबरम यांचे हे वक्तव्य म्हणजे देशातील गरीब जनतेचा अपमान आहे, त्यामुळे चिदंबरम यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी केली आहे.
अमेरिकेच्या चष्म्यातून गरिबीचे सत्य समजण्याचा प्रयत्न केला तरच अशी विधाने करण्यात येतात, असेही शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
डाव्या पक्षांचे नेते मोहम्मद सलीम यांनीही चिदंबरम यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, कॉंग्रेस सत्यापासून दूर जात आहे.