मुंबई दि.१०- मुंबईतील मंत्रालयाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्याला २१ जून रोजी लागलेल्या भयंकर आग प्रकरणात सोमवारी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीपत्रिकेत या कामासाठीचे ८० कोटी रूपयांचे बिल सादर करण्यात आले आहे.पैकी ५० कोटींचे बिल हे दुरूस्तीसाठीचे असून ३० कोटी रूपयांचे बिल हे येथील कार्यालये रिलोकेट करण्यासंबंधी देण्यात आले आहे असे समजते.
याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने चौथा, पाचवा व सहाव्या मजल्यावरची आग विझविल्यानंतर दुरूस्ती व नूतनीकरणासाठी व इलेक्ट्रीफिकेशनसाठी ५० कोटी रूपयांचे बिल सादर केले असून ३० कोटी रूपये शिफ्टिंग चार्जेस म्हणून मागितले आहेत. या आगीमुळे अनेक प्रशासकीय कार्यालये अन्यत्र हलविण्यात आली होती तेथील भाडेही यात धरण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने त्यांची कार्यालये कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कमर्शियल टॉवरमध्ये हलविली होती तर महसूल विभागाने आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून प्रत्येकी २५ लाख असे सव्वा कोटी रूपयांचे बिल दिले असून ते आणीबाणी फंडातून मंजूर करण्यात आले आहे.
सोमवारी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यात ४६०४ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली असून त्यातील मोठा वाटा पाणी प्रश्नासाठी आहे. शेतकर्यांना मदत म्हणून ४०० कोटी रूपये , चारा डेपोंसाठी ५० कोटी रूपये, पिण्याचे पाणी योजनेसाठी ५० कोटी यांचाही त्यात समावेश आहे.