संगमा यांना ‘सद्सद्विवेकबुद्धी’च्या उचक्या

इंदूर दि.९ – राष्ट्रपतिपदाचे भाजपपुरस्कृत उमेदवार व लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांना आता ‘सद्सद्विवेकबुद्धी’च्या उचक्या लागल्या असून त्यांनी सर्वपक्षीय खासदार, आमदारांना सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन सोमवारी केले आहे.
 
१९६९ च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संजीव रेड्डी विरुद्ध व्ही. व्ही. गिरी यांच्या लढतीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यानी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रेड्डींच्या विरोधात गिरींना पाठिबा दिला होता व त्या वेळी त्यांनी मतदारांना सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्या निवडणकीत सद्सद्विवेकबुद्धीला कौल मिळाल्याने गिरी हे विजयी झाले होते.

या वेळी सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन करताना इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास संगमा यांना वाटत आहे.  ते निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने येथे आले आहेत.
तत्पूर्वी, माजी लोकसभा सभापती संगमा यांनी राज्यातील आदिवासी नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी नृत्यातही भाग घेतला. ढोलही वाजवला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ढोलाच्या तालावर नृत्यात सहभाग घेतला. हे दृश्य प्रदेश भाजपच्या अध्यक्ष प्रभात झा पाहात होते.
 
एका प्रश्नास उत्तर देताना संगमा म्हणाले की, ‘यूपीए’ चे अधिकृत उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे आपली कन्या केंद्रीय मंत्री अगाथा संगमा अडचणीत येतील, असे मला वाटत नाही. कारण, राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही पक्षपातळीवर लढविली जात नसते. प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आणि मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. प्रदेश भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी संगमा बोलत होते. या वेळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, पक्षाचे सरचिटणीस नरेंद्रसिह तोमर, मुख्यमंत्री चौहान, झा आदि मान्यवर उपस्थित होते.

आपण निवडणुकीत पराभूत झाला तर, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार करणार का असे विचारता ते म्हणाले की, अद्याप तसा विचार केलेला नाही.