ग्रामीण भागात शाखा उघडण्याचे बँकांना रिझर्व बँकेचे आदेश

चेन्नई, दि. ८ –  देशाच्या ग्रामीण भागात बँकांच्या शाखा उघडण्यासाठी निश्‍चित कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.

माफक खर्चात ग्रामीण भागात बँकेची शाखा काढणे यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे गव्हर्नर डॉ. दुव्वुरी सुब्बराव यांनी सांगितले आहे. ते इंडियन ओव्हरसीज बँकेने आयोजित एका समारंभात नुकतेच बोलत होते.

सरकारकडून सतत सर्वसमावेशक आर्थिक विकासाचा आग्रह धरला जात आहे. बँकांची भूमिका यामध्ये फार महत्त्वाची ठरवणार आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी काम करावे लागणे याकडे एक जबरदस्तीने सोपवलेली कामगिरी यादृष्टीने न पाहता, समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी म्हणून पहावे, असे आवाहनही सुब्बराव यांनी यावेळी केले.

सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे यात मोठी व्यावसायिक संधी दडलेली आहे. त्यामुळे याचा विचार बँकांनी अवश्य करावा असे सांगतानाच, बँकांनी कमी खर्चातील, कमी कर्मचारी संख्या असलेल्या ग्रामीण शाखा सुरू करण्यात स्पर्धा करावी अशी अपेक्षाही सुब्बराव यांनी व्यक्त केली.