पुणे,दि. ५- ब्रह्माण्डांच्या निर्मितीचे कारण शोधण्याच्या कामात ‘हिग्ज बोसान ’ संशोधनामुळे महत्वाचा टप्पा तर ओलांडला आहेच; पण या दृष्टीने भारतीय ऋषिमुनींनी व संतांनी त्या दिशेने चिंतन सुरु ठेवले होते यालाही पुष्टी मिळते. संत तुकाराम महाराजांनी हाच विषय ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशायेवढा’ या शब्दात मांडला होता, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ संगणक विचारवंत डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.
‘हिग्ज बोसान ’शोधामुळे ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशायेवढा’चा पुन: प्रत्यय – डॉ. विजय भटकर
गेल्या पन्नास दिवसाच्या युरोप व अमेरिका दौर्यानंतर ते आजच पुण्याला परतले. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ. भटकर म्हणाले, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ब्रह्माण्डाचा वेध घेण्याच्या दृष्टीने तो अतिशय महत्वाचा टप्पा आहे. विश्वरचना कशी झाली याची एक संकल्पना विसाव्या शतकात शास्त्रज्ञांनी तयार केली ती बर्याच निकषावर बरोबरही आली. या जगात वस्तूला आकार कसा प्राप्त झाला व वस्तूला आकारमान कसे प्राप्त झाले या कळीच्या प्रश्नाचा उलगडा झाला नव्हता. तो उलगडा या ‘देवकणाच्या’ अस्तित्वामुळे झाला आहे.
विज्ञानाच्या दृष्टीकोनातून याचा पहिला वेध नव्वद वर्षापूर्वी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी घेतला व तो त्यांनी त्याकाळचे मोठे शास्त्रज्ञ अल्बई ऑइनस्टाईन यांना कळविला. त्यावर ते आचंबित व अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांच्या निबंधाचे जर्मनमध्ये भाषांतर करून एका प्रथितयश विज्ञाननियतकालिकात (सायन्स जर्नल)मध्ये प्रकाशित केला. हे मूलभूत संशोधन पुढे `बोस ऑइन्स्टाईन स्टॅटिस्टिक’ म्हणून मानला जावू लागला. क्वॉंटन मेकॅनिक्समध्येही `बोस ऑइन्स्टाईन कंडेड सेट’ म्हणून ते प्रसिद्धीस पावले. हिग्ज बोसन कणाचा शोध लागल्यावर डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांचे संशोधन किती द्रष्टे होते हेच स्पष्ट झाले.
अर्थात, भारतीय तत्वज्ञानात हा विचार काही हजार वर्षापूर्वी मांडला आहे. त्यात ब्रह्माण्डाला ‘वस्तू’ संबोधण्यात आले आहे. हा विषय मांडताना एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, भारतीय तत्वज्ञानात जो ईश्वर मानला जातो तो हा शोध नाही. अर्थात त्याचे तसे प्रयोजनही नाही. पण जगाचे व्यवस्थापन भौतिकदृष्ट्या कसे चालले आहे याबाबतच्या हिग्ज बोसान सिद्धांतामुळे पूर्णत्व देतो. भारतीय तत्वज्ञानात कणाद ऋषींनी वैशाषिक दर्शनात हा विषय मांडला आहे. संत तुकाराम महाराज यांनी व अनेक संतांनी निरनिराळ्या संदर्बात याचा उल्लेख केला आहे. विश्वाची निर्मिती कणातून झाली आहे व ती कणातच लय पावणार असल्याचाही या उल्लेख उपनिषदातील चिंतनातून मांडलेला दिसतो. विज्ञानाच्या या नव्या शोधामुळे क्षेत्राचा वेध घेता आला आहे. आता क्षेत्रज्ञांचा वेध घेणे ही पुढची पायरी आहे. गीतेत त्यावर स्वतंत्र अध्याय आहे.
विज्ञानाच्या या शोधाचा उपयोग भारतीय ऋषीमुनींच्या व संतांच्या चिंतनावर प्रकाश पडण्यास उपयोगी ठरणार आहे, असेही त्यांनी शेवटी बोलून दाखविले.
