ही सृष्टी नेमकी कशी निर्माण झाली, याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी सातत्याने चालवलेला आहे. हे विश्व १४ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेले आहे. त्यावेळी नेमके काय घडले, याचा आता अंदाज वर्तवणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी अतिशय तीव्र बुद्धीमत्तेची आणि अनुमान शक्तीची गरज असते. ज्यांच्याकडे ती नसते परंतु विश्वाच्या निर्मितीचे रहस्य आपल्याला कळले आहे असा दावा त्यांना करायचा असतो, असे लोक या सृष्टीच्या निर्मितीच्या मागे कोणती तरी एक महान शक्ती दडलेली आहे. ती या सृष्टीचे चलन-वलन योग्य पद्धतीने घडवून आणत असते, असे मानून मोकळे होतात. अनेक सुशिक्षित जाणकार लोकसुद्धा ही सृष्टी परमेश्वर नावाचा कोणी तरी एक जण चालवत आहे, या भोळ्या कल्पनेवर विश्वास ठेवत असतात. म्हणून अमेरिकेत सांता क्लारा येथे झालेल्या एका परिसंवादामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराच्या अस्तित्वावर चर्चा झाली. चर्चा करणारे होते भले भले शास्त्रज्ञ. ही सृष्टी बिग बँगमधून निर्माण झालेली आहे. म्हणजे फार पूर्वी कधी तरी एक महास्फोट झाला आणि त्यातून हे विश्व निर्माण झाले असे मानले जाते. या सिद्धांतालाच बिग बँग थिअरी असे म्हटले जाते.
सृष्टीचे आदिकारण
हे शास्त्रज्ञ याच विषयावर चर्चा करायला एकत्र जमले होते. ही सृष्टी महास्फोटातून निर्माण झालेली आहे की नाही, यावरच मुळात वाद आहेत. परंतु ती तशी निर्माण झाली आहे असे मानले तरी या महास्फोटामागे तो दैवी हात होता का? असा या चर्चेचा विषय होता. म्हणजे महास्फोट मान्य आहे, पण तो कोणी घडवला, हा आहे चर्चेचा विषय. हा स्फोट घडवणारा परमेश्वर आहे का? ही सृष्टी या महास्फोटामधून १३७५ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेली आहे आणि तिच्या या वयाबद्दलही कोणाच्या मनात संदेह राहिलेला नाही. मात्र एक वर्षापूर्वी घडलेली घटना नेमकी कशी घडली हे आपण आज सांगू शकत नाही. मग १३७५ कोटी वर्षांपूर्वी घडलेली घटना नेमकी अशीच घडली असे कसे सांगता येईल? त्याबाबत अनुमान करण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही. म्हणून शास्त्रज्ञ आपापल्या परीने अनुमाने करत असतात आणि त्या अनुमानांना शास्त्रीय आधार देण्याचा प्रयत्न करत असतात. तो शास्त्रीय आधार आणि त्यावरून केलेली भाकिते यांचा प्रत्यय यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडले जात असतात.
या सृष्टीच्या निर्मितीनंतर तिच्यात झालेल्या अनेक घटना आणि घडामोडी या दैवी नाहीत, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. मात्र विश्वाच्या सुरुवातीला कोणते कण आणि कसे निर्माण झाले आणि त्यांनी कोणकोणती कामे केली याचे सविस्तर संशोधन अजून पूर्ण झालेले नाही. ही सृष्टी निर्माण झाली म्हणजे या सृष्टीतले सारे पदार्थ निर्माण झाले. पण पदार्थ म्हणजे तरी काय आहे? प्रत्येक पदार्थाला एक वस्तुमान आहे आणि ते वस्तुमान म्हणजेच पदार्थ आहे. हे वस्तुमान निर्माण कसे झाले? अल्बर्ट आईन्स्टाईन याने असा सिद्धांत मांडलेला आहे की, वस्तुमान आणि ऊर्जा या दोन गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. म्हणजे ऊर्जेचे रुपांतर वस्तुमानात होते आणि वस्तुमानाचे रुपांतर ऊर्जेत होते. सृष्टीच्या प्रारंभी ऊर्जा निर्माण झाली. ती कोणकोणत्या कणांच्या रूपात निर्माण झाली आणि त्या ऊर्जेचे रूपांतर वस्तुमानात कसे झाले, हे रूपांतर होण्यास कोणते मूलकण कारणीभूत ठरले यावर संशोधन सुरू होते. मात्र हे रूपांतर करण्याचे काम जो कण करतो, त्या कणाचे स्वरूप आणि त्याच्या कामाची पद्धती याची पहिली कल्पना एका भारतीय शास्त्रज्ञाने मांडली. या शास्त्रज्ञाचे नाव सत्येंद्रनाथ बोस. त्याची ही कल्पना सुरुवातीला शास्त्रज्ञांनी स्वीकारली नाही. परंतु त्याने आपल्या कल्पनेचा समावेश असलेला प्रबंध आईन्स्टाईनकडे पाठवून दिला. आईन्स्टाईनने तो स्वीकारला आणि बोस यांची कल्पना मान्य केली.
या कल्पनेतला जो मूलकण आहे त्या मूलकणाला बाकीच्या शास्त्रज्ञांनी आता सत्येंद्रनाथ यांच्या नावावरून बोसॉन असे नाव दिलेले आहे. आजपर्यंत बोसॉन कणाचे अस्तित्व आणि त्याची कार्यपद्धती या विषयीची कल्पना व्यवहारत: (थिअरॉटिकल) मान्य केली गेली होती. प्रत्यक्षात बोसॉन नावाचा कण अस्तित्वात आहे का आणि तो ऊर्जेचे रूपांतर वस्तुमानात करतो का, हे पडताळून पहायचे होते आणि त्यासाठीच यूरोप खंडातील सर्न येथे एक प्रयोग करण्यात आला. सृष्टीच्या सुरुवातीला जे कण निर्माण झाले ते कण एका निर्वात पोकळीत घेऊन त्यांची टक्कर घडवून आणली. त्यातून बोसॉन कण बाहेर पडले आणि ऊर्जेच्या स्वरूपातील या मूलकणांना या बोसॉनमुळे वस्तुमान प्राप्त झाले. हे सगळे या पोकळीत दिसून आले आणि सृष्टीच्या निर्मितीच्या प्राथमिक अवस्थेत जे काही घडले असेल त्यातील एका क्रियेवर प्रकाश पडला. या मोठ्या प्रयोगामागची तात्विक भूमिका एका भारतीय शास्त्रज्ञाने मांडलेली आहे ही गोष्ट आपल्या दृष्टीने अभिमानाचीच आहे. याच संबंधातील प्रयोगावर आता सुद्धा एक भारतीय शास्त्रज्ञ काम करत आहे. त्याचे नाव आहे डॉ. अशोक कोतवाल.
