सोने दरवाढीची देवांनाही झळ

नुकत्याच पार पडलेल्या गुरूपौर्णिमेनिमित्ताने भाविकांनी देशभरातील प्रसिद्ध मंदिरात रांगा लावून आणि देवाला कांही ना कांही अर्पण करून देवांचे आशीर्वाद घेतले असले तरी यंदा या मंदिरातून सोने अर्पण करण्याचे प्रमाण चांगलेच घटले असल्याचे दिसून आले आहे. अगदी तिरूपती,गुरूवायूर ही प्रसिद्ध मंदिरेही त्याला अपवाद नाहीत. सोन्याचे चढलेले दर यामुळे भाविकांनी यंदा सोन्यापेक्षा रोख रककमच देवापुढे ठेवणे पसंत केल्याचे मंदिर व्यवस्थापन समित्यांकडून सांगण्यात आले.

आंध्रातील प्रसिद्ध तिरूपती मंदिरात दर महिन्याला साधारणपणे १००किलो सोने आणि १२५ किलो चांदी देवापुढे अर्पण केली जाते. यंदा त्यात लक्षणीय घट झाली असून केरळच्या गुरूवायूर मंदिरातही सोने चांदीच्या प्रमाणात २० टक्के घट दिसून आली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी देवस्थानातही साईचरणी सोने अर्पण करण्याचे प्रमाण यंदा कमी झाले आहे आणि मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातही हीच परिस्थिती आहे. शिर्डीला यंदा गुरूपौर्णिमेच्या दिवशी देवापुढे चार कोटी रूपयांची रक्कम जमा झाली असली तरी सोने सात तोळेच आले आहे.

गतवर्षी एप्रिल २०११ मध्ये सोन्याचे दर होते १० ग्रॅमला २१ हजार रूपये. यंदा हाच भाव तीस हजार रूपयांच्या घरात गेला आहे. परिणामी भाविकांनी सोने अर्पण करण्यापेक्षा रोख रक्कमच अर्पण करण्यास अधिक पसंती दिली आहे असे सांगितले जात आहे कारण यंदा सोने कमी आले असले तरी रोख रक्कमेत मात्र २५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे