कोकणात अतिवृष्टी

पुणे, दि.४ – कोकण भागात अनेक ठिकाणी गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली आहे. संगमेश्‍वर भागात सर्वाधिक २१० मिमी पाऊस पडला असून, रत्नागिरी २००, रोहा, गगनबावडा येथे १५० मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. कोकणात देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा पुढील ४८ तासांत कायम ठेवण्यात आला आहे. कोकणासह राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र दोन दिवसांच्या तुलनेत त्याचे प्रमाण थोडे कमी झाले होते.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्राकार वारे निर्माण झाल्याने राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, या वार्‍याची तीव्रता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची तीव्रताही कमी झाली आहे. मात्र कोकणात त्याची तीव्रता जास्त आहे. गेल्या २४ तासात कणकवलीत १४०, पाली १३०, माणगाव १२०, चिपळून, राजापूर ११०, दापोली १००, देवगड, राहुरी, महाबळेश्‍वर ९०, वसई, मुंबई, भिरा, महाड, लांजा, सावंतवाडी येथे प्रत्येकी ८०, पालघर, कुडाळ, मालवण, वाशी येथे ७०, ठाणे, अलिबाग, पेण, उरण येथे ५०, गुहाघर, वेंगुर्ला, नेवासा येथे ४०, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, पनवेल, संगमनेर येथे ३०, डहाणू, जामखेड, अकोला, धुळे, श्रीरामपूर, सोलापूर येथे २०, तसेच कल्याण, कोपरगाव, जळगाव, जुन्नर, कोल्हापूर येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

घाट परिसरातही जोरदार पाऊस पडत असून, कोयना घाटात १४०, आम्बोणे, ताम्हिणी घाटात ८०, शिरगाव घाटात ६०, खोपोली घाटात ५०, लोणावळा घाटात ४० मिमी पाऊस पडला. पुढील ४८ तासात कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.