हाच का नक्षलींशी सामना ?

महाराष्ट्राच्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा उपद्रव होत आहे. यापूर्वी गोंदिया जिल्हा कधी उपद्रवी जिल्हा म्हणून ओळखला जात नव्हता. परंतु तो सुद्धा आता उपद्रवकारक झाला आहे आणि तिथे सुशिक्षित आदिवासी समाजामध्ये नक्षलवादाविषयी आकर्षण असणार्‍या तरुणांची संख्या हळू हळू वाढत आहे. दुसर्‍या बाजूला तितक्याच उदासीनपणे सरकारच्या नक्षलवाद विरोधी उपाययोजना सुरू आहेत. सुमारे १९ वर्षांपूर्वी या भागातला नक्षलवाद निपटून काढण्यासाठी ग्रुप-१३ या नावाची एक वेगळी यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय झालेला होता. परंतु हा निर्णय अजून सुद्धा अंमलात आलेला नाही. १९ वर्षांच्या या काळात सुद्धा नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी म्हणून अनेक घोषणा आणि वल्गना करण्यात आल्या. परंतु त्यातल्या फार कमी घोषणा प्रत्यक्षात आल्या. अशी सारी उदासीनता असताना सुद्धा सरकार नक्षलवाद्यांचे आव्हान संपुष्टात येत असल्याचे दावे करत आहे आणि दाव्याच्या समर्थनार्थ कोठे कोठे किती नक्षलवादी मारले याचे खोटे आकडे सादर करायला लागले आहे.

आजवर जेव्हा जेव्हा पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमकी झडल्या तेव्हा पोलीसच अधिक मारले गेले. त्या मानाने शिस्तीत आणि नियोजनबद्धपणे काम करणारे नक्षलवादी मात्र अधिक तयारीत होते. त्यामुळे त्यांच्या बाजूने कसलेच नुकसान झाले नाही. असे सातत्याने घडत गेले. नेहमी पोलीसच कामी येतात आणि नक्षलवादी का मारले जात नाहीत, असे प्रश्न निर्माण व्हायला लागले. म्हणून आता सामान्य गरीब, निरपराध नागरिकांनाच लक्ष्य करून टिपले जात आहे आणि तोच आकडा नक्षलवाद्यांचा खातमा केला म्हणून दाखवला जात आहे. नक्षलवादी आणि माओवादी यांच्या प्रभावाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पोलीस बनावट चकमकी घडवायला लागले आहेत. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बसगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केन्द्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी २१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा केला. परंतु ठार झालेले हे सारे नक्षलवादी नव्हते, तर सामान्य आदिवासी शेतकरी होते हे आता उघड व्हायला लागले आहे. म्हणून ही घटना आता वादाचा विषय झाली आहे.
पोलिसांनी नक्षलवादी समजून निरपराध आदिवासींच्याच हत्या केल्या आहेत असा आरोप आता होत आहे. या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा मतभेद आहेत. आदिवासी कल्याण मंत्री किशोरचंद्र देव यांनी आदिवासींच्या हत्या झाल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी मात्र ठार झालेले सगळे नक्षलवादीच होते, असा नेहमीप्रमाणे दावा केला आहे आणि किशोरचंद्र देव यांनी हा दावा खोडून काढला आहे.

बिजापूर जिल्ह्यातल्या या हत्याकांडाची बातमी हाती आली तेव्हाच अशा काही शंका आल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून केन्द्रीय राखीव पोलीस दलाचे हजारो जवान या भागात तैनात केलेले आहेत. हे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात काही वेळा चकमकी झडतात पण अशा चकमकीत नक्षलवादीच वरचढ ठरतात असा अनुभव आहे. याच भागात तीन वेळा झडलेल्या अशा चकमकींत जवान मोठ्या प्रमाणावर कामी आले आहेत पण त्या मानाने नक्षलवाद्यांचे किरकोळ नुकसान झाले आह. जवानांनी आक्रमक रूप धारण करून नक्षलवाद्यांवर हल्ला केलाय आणि नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर मारले जाऊन पोलिसांपैकी कोणी साधे जखमीही झाले नाही असे कधी घडतच नाही. कारणे काहीही असोत पण नक्षलवादीच पोलिसांना भारी ठरतात. कालच्या चकमकीत मात्र असे घडले नाही. सरकारने २१ नक्षलवादी मारल्याचा दावा केला आहे आणि पोलिसांपैकी केवळ सहा जण जखमी झाले आहेत. असे घडू शकले कारण ज्यांना मारल्याचा दावा पोलीस करीत आहेत ते नक्षलवादी नसून सामान्य आदिवासी नागरिक होते. या चकमकींची झळ बसलेल्या लोकांनी आपल्यापैकी कोणीही नक्षलवादी नसल्याचा दावा केला आहे. नक्षलवाद्यांना मारल्याच्या नावावर पोलिसांनी काही लहान मुलसह २१ जणांना मारले असल्याचे या गावकर्‍यांनी सांगितले. काही पत्रकारांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता गावकर्‍यांनी केलेला आरोप खरा असल्याचे त्यांनाही आढळले.

या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला पण तिथे त्यांना कसलाही शस्त्रसाठा वगैरे सापडला नाही. केवळ एक गावठी बंदूक सापडली. मारलेल्या लोकांत पाच जण धोकेबाज अतिरेकी होते असे राखीव पोलीस म्हणत असले तरी त्यांनाही हे पाच जण कोण आणि त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती देता आली नाही. बसगुडा पोलीस ठाण्यात त्यांच्यातल्या कोणावर एखादाही गुन्हा दाखल नाही. तसे स्थानिक पोलिसांनीच स्पष्ट केले आहे. राखीव पोलीस, मारले गेलेले लोक नक्षलवादीच होते हे नाना प्रकारचे युक्तिवाद करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण वरचेवर ते प्रयत्न फसवे असल्याचे उघड होत आहे. एकंदरीत सरकारचे नक्षलवादी संपत आले आहेत असे दावे पोकळ असल्याचे वरचेवर आढळून येत आहे.