मत्स्यकन्या ही कल्पनाच

जलपरी, मत्स्यकन्या खरोखरच अस्तित्त्वात असतात का या चर्चेला अमेरिकन शास्त्रज्ञांनी आता पूर्णविराम दिला असून मरमेडस म्हणजेच मत्स्यकन्या ही केवळ कवीकल्पना असल्याचे स्पष्ट केले आहे. नॅशनल ओशिनिक अॅन्ड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेशन ने या संदर्भात स्पष्टीकरण देताना मरमेड अस्तित्त्वात असल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याचे सांगितले आहे. अर्धे शरीर माणसाचे आणि अर्धे शरीर माशाचे असलेल्या या मरमेड शतकानुशतके बालवाङमयात स्थान मिळवून आहेत. भारतात त्यांनाच मत्स्यकन्या अथवा जलपरी या नावाने संबोधले जाते आणि भारतीय बाल साहित्यातही त्या आपले खास स्थान राखून आहेत.

मरमेडवर अॅनिमल प्लॅटेन वाहिनीवर नुकताच एक खास शो करण्यात आला होता. मे महिन्यात प्रसारित झालेल्या या शोनंतर वरील संस्थेकडे मरमेड खरोखरच आहेत का याची विचारणा करणारे अक्षरशः हजारो फोनकॉल आले होते. हा शो डॉक्युमेंटरीप्रमाणेच शूट केला गेला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांना अशा जलपर्‍या अस्तित्वात असाव्यात अशी खात्रीच पटली होती. त्यावर वरील संस्थेने तसा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही असा खुलासा करून जलपरी ही कल्पनाच असल्याचे स्पष्ट केले आहे.

अर्थात जलपरी अथवा मरमेड ही संकल्पना नक्की कधी अस्तित्त्वात आली असावी याबाबत मात्र नॅशनल ओशिनिक या संस्थेने कोणताही खुलासा केलेला नसला तरी त्यांच्यातर्फेच देण्यात आलेल्या माहितीनुसार ३० हजार वर्षांपूर्वीच्या गुहेत काढण्यात आलेल्या भित्तीचित्रामध्ये या अद्भूत जादुमयी जलपर्‍या पेंटींगमधून रेखाटण्यात आल्या आहेत असे म्हटले आहे.