तीन उमेदवारांच्या अर्जाची अट साहित्य संमेलन निवडणुकीसाठी जाचक

पुणे, दि. ३ – साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी घटक संस्थेकडे सुचविण्यात आलेल्या नावांपैकी केवळ तीन नावे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे पाठविण्याची अट हीच घटक संस्थांसाठी मारक ठरत आहे. ही अट रद्द करण्याची मागणी करणार्‍या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मागणीवर साहित्य महामंडळाने अद्यापही निर्णय न घेतल्याने पुन्हा एकदा याच समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

चिपळूण येथे होणार्‍या आगामी ८६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (दि. ९) सुरू होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे आणि समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या दोघांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतले आहेत. याखेरीज कवी अशोक बागवे यांचेही नाव चर्चेत आहे. या तिघांसह आणखी काहीजणांची नावे सुचविणारे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाले तर, मसाप पदाधिकार्‍यांना कोणाला वगळायचे ही कठीण प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचे काम करावे लागणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद ही आद्य साहित्य संस्था असल्याने पुण्यातूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार साहित्यिक उत्सुक असतात. त्याचप्रमाणे परिषदेकडे अर्ज दाखल झाला म्हणजे आपल्याला विजय मिळतो. अशीदेखील उमेदवारांची मानसिकता असते. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी तीनपेक्षा अधिक नावे सुचविण्यात आल्यावर कोणाला वगळायचे ही परिषदेच्या पदाधिकार्‍यांपुढची समस्या असते.

यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, तीन उमेदवारांची अट रद्द करावी या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मागणीबाबत साहित्य महामंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तीनपेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले तर, कोणाला वगळायचे याबाबतचे अधिकार संबंधित घटक संस्थेला दिलेले आहेत. प्रथम सादर झालेले तीन अर्ज, साहित्यिक गुणवत्ता किंवा अन्य उमेदवारांना विश्‍वासात घेऊन उर्वरित नावे साहित्य महामंडळाकडे पाठविणे यापैकी एका मार्गाचा अवलंब करणे एवढेच घटक संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या हाती असते. साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्ती प्रक्रियेमध्ये हा विषय कार्यपत्रिकेवर आहे. पुढील वर्षी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्याला आल्यावर यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.