एअर इंडिया वैमानिकांचा संप मिटला

नवी दिल्ली, दि. ३ – तब्बल ५८ दिवसांनी एअर इंडियाच्या ४३४ वैमानिकांनी संप मागे घेतला . येत्या ४८ तासांत संप मागे घेण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्याने गेल्या ५७ दिवसांपासून संपावर असलेल्या एअर इंडिया वैमानिकांच्या संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयाला संप मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले. प्रलंबित वेतन आणि भत्ते वेळेत न मिळाल्यामुळे वैमानिकांनी संप पुकारला होता.

एअर इंडियाचे ’इंडियन पायलटस गिल्ड’ या संघटनेशी संलग्न सुमारे ४३४ वैमानिक आठ मे पासून संपावर गेले होते. या संपामुळे सरकारला ६०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
एअर इंडियाने संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यामुळे वैमानिकांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने संपकरी वैमानिकांच्या मागण्यांवर विचार करण्याचे तसेच बडतर्फ केलेल्या वैमानिकांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेतला.

संपाचा तिढा मिटला असून लवकरच सर्व वैमानिक कामावर रुजू होतील असे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.