२६/११ च्या हल्ल्यात ४० भारतीयांचा हात – पाकिस्तानचा दावा

इस्लामाबाद दि.२ –  संशयित दहशतवादी जबीउद्दीन अन्सारीने आपण कराची येथून मुंबईवरील हल्ल्याचे नियंत्रण करीत होतो, अशी कबुली दिल्यानंतर ४८ तासांत या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय नागरिकांचा हात होता, असा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे.‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाला देऊन म्हटले आहे की, आमच्या माहितीनुसार किमान ४० भारतीय नागरिकांचा मुंबईच्या २६/११ हल्ल्यात हात होता.

नुकताच अटक केलेल्या अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्याविषयीची माहितीचे देवघेव करण्याची तयारी पाकिस्तानने दाखविली आहे. असेही वृत्तपत्रात म्हटले आहे.

येत्या ४ जुलैपासून उभय देशात दोन दिवसांची परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा होणार असून त्या चर्चेत अन्सारीच्या अटकेचा विषय उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय नागरिकांच्या मदतीविना मुंबईवर हल्ला करणे दहशतवाद्यांना शक्य झाले नसते, असा दावा करून पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय अधिकार्‍यांनी यापूर्वीही माहितीची आदानप्रदान करण्यास नाराजी दर्शविली होती. आम्ही ऐकीव माहितीवर कधीही कारवाई करीत नसतो.