राहुल गांधीं दोन दिवसांच्या हिमाचल दौर्‍यावर

शिमला दि.२- हिमाचल प्रदेशात २०१३च्या सुरवातीलाच होत असलेल्या विधानसभांसाठी काँग्रेसची किती तयारी आहे याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी दोन दिवसांच्या हिमाचल दौर्‍यावर आले आहेत. कुल्लू जिल्ह्यात ते प्रथम येत असून त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. गुप्तचर अधिकार्‍यांबरोबरच जिल्हा पोलिसही या कामी लावण्यात आले असून राहुल गांधी यांना सुरक्षा देण्यासाठी ४०० लोक तैनात करण्यात आले आहेत. बॉम्ब नाशक पथके तसेच बूलेट प्रूफ वाहनही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे असे कुल्लूचे पोलिस सुपरिटेंडेंट अशोक कुमार यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी राहुल गांधी हिमाचल प्रदेशच्या जिल्हा काँग्रेस प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत तसेच निवडून आलेल्या युवा काँग्रेस नेत्यांनाही भेटणार आहेत. नॅशनल स्टुडंटस ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनही ते करणार आहेत. त्यानंतर हिमाचलचे आमदार, खासदार व वरीष्ठ नेत्यांना ते मंगळवारी भेटणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नुकतेच राजीनामा द्यावे लागलेले केंद्रीय मंत्री वीरभद्रसिंग यांनाच पुन्हा काँग्रेसचा चेहरा म्हणून पुढे आणता येईल काय याची चाचपणी राहुल करणार आहेत. वीरभद्रसिंग हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आहेत पण शिमला न्यायालयाने त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित केल्याने त्यांना केन्द्रीय मंत्रीमंडळातून नुकताच राजीनामा द्यावा लागला आहे.