पुणे, दि.१ – शिक्षणाच्या बाबतीत आज सगळीकडे टक्केवारीचे परिमाण, निकष लावले जात आहेत. त्यातून विद्यार्थी केवळ पुस्तकी रट्टा मारत आहे. त्याचा परिणाम शिक्षक, संस्था आणि विद्यार्थी कोणत्याही विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करताना दिसत नाही. केवळ कॉपी पेस्टची सवय लागल्याने मागील काही वर्षात भारतात संशोधनाचे प्रमाण कमी झाले असल्याची खंत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या लक्ष्मी रस्ता येथील नूतन इमारतीचे वळसे- पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, संस्थेचे उपाध्यक्ष का. बा. पारखी, सचिव विद्या महाशब्दे, सहसचिव जयश्री बापट, कोषाध्यक्ष शामा जाधव, बांधकाम समिती सचिव दीपक मेहता, एन. के. टी. ट्रस्टचे मु ख्य विश्वस्त नानजीभाई ठक्कर, नगरसेवक आबा बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलीप वळसे- पाटील म्हणाले की, एखाद्या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करण्याऐवजी टक्केवारीमुळे सगळीकडे कॉपी पेस्टची सवय लागली आहे. ही पद्धत राज्याच्या, देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. यावर शिक्षणसंस्था, पालकांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन घेऊन व जाचक अटी न लादता त्यांना आवडेल त्या विषयात शिक्षण घेण्याची संधी दिली पाहिजे. आज बरेच तरुण पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. पण उपलब्ध जागांसाठी या विद्यार्थांकडे पुरेशे कौशल्य नसल्याने त्यांना घेतले जात नाही, परिणामी ते बेरोजगार आहेत. त्यामुळे केवळ पदवी देवून आपली जबाबदारी संपत नाही. तर उत्तम संशोधनात्मक शिक्षण देणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे.
हुजूरपागा संस्था गेली १२७ वर्षे सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. आज संस्थेचा विस्तार होत आहे. त्यांना जागेचा मुख्य आहे. त्यासाठी मी सदैव सहकार्य देईल, तसेच माझ्या मंचर येथील शिक्षण संस्थेच्या वतीने ११ लाख रुपयांची देणगी देत आहे.
शाली बनकर म्हणाल्या की, हुजूरपागा संस्थेचा इतिहास अभिमानास्पद आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणून माझे त्यांना पूर्ण सहकार्य राहील. तसेच स्त्री- भ्रूणहत्या हा प्रश्न अत्यंत ज्वलंत झाला असून, यामध्ये उच्चशिक्षित समाजाचा सहभाग मोठा आहे. यावर मात करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील विशेषत: महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्ष शामा जाधव यांनी प्रस्ताविक केले, तर सचिव विद्या महाशब्दे यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, पालक, आजी-माजी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.