रुपकुमार राठोड मराठीत प्रथमच गाणार

सरफरोशमधले ’जिंदगी मौत ना बन जाए’ किंवा नुकत्याच आलेल्या अग्निपथमधले ’मेरी अधुरी..’ अशी एकापेक्षा एक भन्नाट गाणी दिलेले गायक रुपमार राठोड हे आता मराठीत गाणे गाणार आहेत.

अजय-अतुल यांचे संगीत असलेल्या ’भारतीय’ या सिनेमामध्ये असलेल्या एका भजनाला त्यांचा आवाज देण्याचे निश्चित झाले आहे. निर्माते अभिजीत घोलप यांची ’देऊळ’ नंतरची ही दुसरी निर्मिती. गिरीश मोहिते या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून, यामध्ये सुबोध भावे, जितेंद्र जोशी, हृषिकेश जोशी, कुलदीप पवार, डॉ. मोहन आगाशे, मीता सावरकर अशी स्टारकास्ट असेल.

याबाबत बोलताना दिग्दर्शक गिरीश म्हणाले,’ या सिनेमाचे कथानक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या गावात घडते.
ही गोष्ट तिकडची असली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनाला भिडेल अशी आहे. म्हणूनच आम्ही नवा मॅस्कॉट आणला आहे. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन धोतर नेसलेला होता. आमचा मॅन फॉर्मल्समधला आहे. कारण, तो आजचा आहे. त्याला भिडणारे प्रश्न सिनेमात दिसतील.

सिनेमाचे शूट पूर्ण झाले असून, येत्या १० ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.