महाराष्ट्र शासन संवेदनशील नाही. त्यामुळे नागरिकांची किंवा कर्मचार्यांची कोणतीही मागणी पहिल्यांदा केल्याबरोबर सरकारच्या लक्षात येत नाही. ती समजून घेतली पाहिजे याची सरकारला जाणीवच होत नाही. खरे तर चांगल्या प्रशासकाची ही सर्वात मोठी खूण असते. मागणी मांडणारा ती किती प्रभावीपणे मांडतो यालाच सरकार नको एवढे महत्त्व देते. ती पद्धत कशीही असो; पण त्या प्रश्नाच्या अंतरंगात शिरून आपण तो नीट समजून घेतला पाहिजे आणि तो पटकन सुटेल यासाठी आपले कौशल्य पणाला लावले पाहिजे असे एकाही पुढार्याला आणि मंत्र्याला वाटत नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आणि मग अगदी गळ्याशी आल्यावर वेडीवाकडी धडपड करणे हीच त्यांची कार्यशैली झाली आहे. या शैलीचा एक परिणाम आता जाणवत आहे. पंढपुरात आषाढी एकादशीचे पर्व सुरू होत आहे आणि नेमके याच दिवशी तिथल्या सफाई कामगारांनी संप सुरू केला आहे. सफाई कामगार हा आपल्या अधिकार श्रेणीत चतुर्थश्रेणीत मोडतो; पण तोच जर अडून बसला तर सर्वांची क्लास वन फजिती करू शकतो.
पंढरपुरात आता सध्या हीच स्थिती उद्भवली आहे. हे सफाई कामगार गेल्या तीन चार वर्षांपासून आपल्या मागण्या मांडत आले आहेत पण सरकार आपल्या नेहमीच्या बोथटपणाने त्यांच्याकडे पहात आहे. शेवटी त्यांनी आता ऐन एकादशीलाच संप सुरू केला आहे. पंढरपूरचा महिमा पोथ्या पुराणात फार मोठा असेल पण आषाढी एकादशीला या शहरात घाणीचे साम्राज्य असते. नाकाला रुमाल लावल्या शिवाय गावात फिरता येत नाही. स्वच्छतेची सारी यंत्रणा कोलमडलेली असते. या गावाची लोकसंख्या आहे सव्वा लाख. अशा गावात एकाच दिवशी दहा ते बारा लाख लोक आले तर अशा या लहान गावातल्या सार्याच यंत्रणा कशा कोलमडत असतील याचा या वारीला न जाणारांनी आपल्या घरी बसून केवळ अंदाज करावा. वैष्णवाची एवढी दाटी होते. ते कितीही पवित्र भावनेने आणि केवळ दर्शनासाठीच येत असले तरीही त्यांच्या तिथल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्या स्वच्छतेच्या सोयी कराव्याच लागतात. या यात्रेला येणारे लाखो भाविक मुख्यत्वे ग्रामीण भागातून येत असतात. त्यांना शौचाला उघड्यावर जाण्याची सवय असते आणि त्यामुळे या यात्रेच्या काळात सफाई कामगारांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. सरकारचे मात्र या समस्येकडे लक्ष नाही. या दशलक्षाच्या मेळाव्याची स्वच्छता राखण्याचे काम केवळ दोन हजार कामगारांवर सोपवलेले असते. त्यामुळे ज्या पंढरपूरचे वर्णन भू लोकीचे वैकुंठ असे केले जाते. त्या पंढरपुरात प्रवेश करताना प्रचंड दुर्गंधीशी सामना करावा लागतो. स्वच्छतेची तुटपुंजी व्यवस्था आणि अपुरे सफाई कामगार याचा हा परिणाम होय. पण… आता तर याही कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आता पंढरपुरात प्रवेश करण्याची अवस्थाच राहिलेली नाही. हा संप लवकर मिटला नाही तर स्वच्छतेची सारी यंत्रणाच कोलमडून पडेल आणि होईल तो हाहा:कार अभूतपूर्व असेल. मठ्ठ सत्ताधारी नेत्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना करावीशी वाटते.
महाराष्ट्राचे स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे याच जिल्ह्याचे पालक मंत्रीही आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत या शहरात वास्तव्य केले आहे. त्यांना या स्थितीची जाणीव असायला हवी. आजकाल तीर्थक्षेत्रे किती स्वच्छ केली जात आहेत. तुळजापुरातही असेच लाखो भाविक येतात. शिर्डीतही गर्दी असते पण पंढरपूरसारखी घाण अन्य कोणत्याच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिसत नाही. आपण मंत्री झालो तर दुसरे काही करणार नाही आणि या वैकुंठातला हा नरक संपवूच असे एकाही मंत्र्याला आणि नेत्याला का वाटत नाही ? नाशिक किंवा हरद्वारला कुंभमेळा भरतो तेव्हा तिथे अशी घाण होऊ नये म्हणून हजारो शौचालये उभारलेली असतात. आता आता फायबरची शौचालये मिळायला लागली आहेत. तशी किमान ५० हजार तरी शौचालये पंढरीत कायम उभारलेली असायला हवीत कारण नाशिक आणि हरद्वारला १२ वर्षाला एकदा कुंभमेळा असतो पण पंढरपुरात तो दरसाल भरतो. पंढरपूरकडे कोणी त्या दृष्टीने पहातच नाही. सर्वात पवित्र स्थान असून ते सर्वाधिक उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. भक्त पुंडरिकाने पांडुरंगाला आपल्या मातृपितृ भक्तीच्या जोरावर येथे येऊन विटेवर उभे रहायला लावले. पण आता या पंढरीला स्वच्छ ठेवण्यासाठी पुंडरिकाएवढ्या एखाद्या पुण्यवान भक्ताची गरज आहे. पंढरीचे भक्त म्हणवून घेऊन गळ्यात माळा घालून सत्तेवर बसणारे अनेक माळकरी आहेत पण ते खरे पंढरीचे भक्त नाहीत. त्यांची खरी भक्ती पंढरपूरच्या शेजारच्या ‘दामाजी’वर आहे. त्यांना दामाजीशिवाय काही सुचत नाही. तसे काही सुचत असते तर त्यांनी पंढरपूरचे पावित्र्य राखण्याचा ध्यास घेतला असता. ध्यास घेऊन काम करणे म्हणजे भक्तियुक्त अंत:करणाने काम करणे असे ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. मनापासून भक्ती असेल तरच ध्यास घेऊन काम होते. आता ते तसे केले जात नाही म्हणून सारे प्रश्न गंभीर झाले आहेत. भक्त बिचारे म्हणत आहेत, ‘देवा तुझी पंढरी, अशी कशी रे वांगली ?’