झुरळांचे अस्तित्व पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आवश्यकच

झुरळांना घाबरताय ? झुरळाची किळस येते ? घरात झुरळे नकोत ? झुरळे नष्ट करायला हवीत ? या सार्‍या प्रश्नांना तुमचे उत्तर हो असेल तर थांबा आणि पुन्हा एकदा विचार करा. भारतीय वंशाच्या, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मध्ये बायोलॉजीच्या प्रमुख असलेल्या श्रीनी कंभमपती या शास्त्रज्ञ महिलेने झुरळांचे अस्तित्व पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आवश्यक असल्याचा सिद्धांत मांडला असून झुरळे नष्ट झाली तर जीवसृष्टी नामशेष होण्याच्या पंथाला लागेल असा इशारा दिला आहे.

श्रीनी यांच्या मते झुरळांमुळे आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेली पृथ्वीची नायट्रोजेन सायकलच कोसळेल. झुरळे कुजणार्‍या सेंद्रीय पदार्थांवर जगतात.या पदार्थात मोठ्या प्रमाणात नायट्रोजेन अडकलेला असतो. झुरळे हे पदार्थ खातात तेव्हा त्यात अडकलेला नायट्रोजेन मोकळा होतो आणि जमिनीत मिसळतो. हाच नायट्रोजेन वनस्पतींकडून वापरला जातो. झुरळे नष्ट झाली तर पृथ्वीवरील वनसंपदेवरही फारच वाईट परिणाम होऊ शकतो आणि पर्यायाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच अडचणीत येऊ शकते.

पृथ्वीवर सध्या झुरळांच्या  पाच ते दहा हजार प्रजाती आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रजाती पक्षी प्राण्यांचे भक्ष्य आहेत. म्हणजे झुरळे ही स्वतःच अन्य जातींच्या प्राण्यापक्षांचे भक्ष्य आहेत. त्यात मांजरे ,लांडगे, सरपटणारे प्राणी तसेच गरूडासारखे पक्षीगण आहेत. झुरळे नष्ट झाली की या पक्ष्याप्राण्यांचीही उपासमार होणार आहे आणि जगातील वन्य जीवनालाच धोका निर्माण होणार आहे.

अर्थात इतक्यातच ही झुरळे नामशेष होण्याचा कोणताही धोका नाही. कारण असेही म्हटले गेले आहे की तिसरे महायुद्ध समजा झालेच तर त्यातून कोणते प्राणी जिवंत राहू शकतील हे सांगता येत नसले तरी झुरळे नक्की जिवंत राहतील.

Leave a Comment