पुणे, दि. ४ – उत्तम संगीत आणि नाटक यासह अभिजात कलाकृती रंगमंचावरुन सादर करीत रसिकांचा कान घडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी गंधर्व नाटक मंडळी ही नाट्यसंस्था शताब्दी वर्षांत पदार्पण करीत आहे. बालगंधर्व यांच्या नावाचा अंतर्भाव असलेली ही नाट्यसंस्था काळाच्या ओघात बंद पडली असली, तरी संस्थेच्या आठवणी अजूनही रसिकांच्या मनामध्ये ताज्या आहेत.
संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व आणि नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांनी पाच जुलै १९१३ रोजी पुण्यामध्ये गंधर्व नाटक मंडळी या कंपनीची स्थापना केली. बालगंधर्व यांचे १२५ वे जयंतीवर्ष आणि गंधर्व नाटक मंडळीचे शताब्दीवर्ष असा दुहेरी योग जुळून आला आहे. बालगंधर्व यांच्यासमवेत रंगमंचावर नायिकेच्या भूमिका साकारलेल्या जयमाला शिलेदार यांच्या कन्या आणि संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी यानिमित्ताने गंधर्व नाटक मंडळीच्या आठवणींना उजाळा दिला. आईने वेळोवेळी या आठवणी सांगून मला इतके समृद्ध केले आहे की जणू त्या काळातच मी होते, अशीच माझी भावना आहे, असे कीर्ती शिलेदार यांनी सांगितले.
कीर्ती शिलेदार म्हणाल्या, `किर्लोस्कर नाटक मंडळी या संस्थेतूनच गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेचे बीज सामावले आहे. त्यामुळे संस्थेने किर्लोस्कर नाटक मंडळीची परंपरा पुढे नेत सादर केलेली संगीत नाटके हा संगीत रंगभूमीचा सुवर्णयुगाचा काळ होता. कलाकार म्हणून केवळ स्वतःपुरते न पाहता बालगंधर्वांनी ही कंपनी कशी काम करेल, याकडे लक्ष दिले. त्यांनी वैभवशाली, भव्य आणि देखणी नाटके सादर केली. त्यामध्ये उधळपट्टीचा भाव नव्हता. तर, रसिकांना दर्जेदार कलाकृती आणि सुखावह वाटणारा अनुभव द्यावा हाच उद्देश होता. रंगभूमी हा धर्म मानून नाटकाचे नेपथ्य, सजावट, रंगभूषा, वेशभूषा, पात्रयोजना, साथीची वाद्ये आणि साथीदार याकडे लक्ष देण्यासाठी स्वतंत्र विभाग होते. अहमदजान थिरकवॉं (तबला), कादरबक्ष (सारंगी), हरिभाऊ देशपांडे आणि केशवराव कांबळे (ऑर्गन) या साथीदारांसह बालगंधर्वांनी रसिकांना समृद्ध नाट्यानुभव दिला.‘