पुणे, दि.२७ – मुंबईमध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरक्षेचा उपाय म्हणून संगणकांवरची सर्व माहिती एनआयसीकडे (राष्ट्रीय माहिती सेवा केंद्र) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडे नुकताच पाठविण्यात आला आहे.
मंत्रालयातील आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाली. भविष्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयात अशा प्रकारचा आगडोंब उसळल्यास त्यातून माहिती सुरक्षित राहावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनी दिली.
येवला म्हणाले, या बाबत एनआयसीच्या येथील अधिकार्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी पुढील चर्चेसाठी संस्थेच्या उपमहासंचालकांना प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच परिवहन आयुक्तालयातून या प्रस्तावाची प्रत एनआयसीला पाठविण्यासंबंधी पाठपुरावा सुरू आहे.
पुणे आरटीओअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, बारामती आणि अकलूज हे विभाग येतात. या विभागात सध्या टूल्स, वाहन आणि सारथीचे काम संगणक प्रणालीच्या माध्यातून केले जाते. दैनंदिन कामकाजाच्या सर्व नोंदी त्यातून संगणकावर संकलित केल्या जातात. आतापर्यंत आरटीओकडे उपलब्ध असलेली माहिती आणि दैनंदिन कामकाजाच्या नोंदी, याचा बॅकअप घेऊन एक फाईल आरटीओ कार्यालयाकडे ठेवली जाणार आहे, दुसरी एनआयसीकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर दर आठवड्याला अशाप्रकारे माहिती त्यांना देण्यात येईल. परिवहन आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर याची अंमलबजावणी होणार असल्याचे येवला यांनी स्पष्ट केले.