कथा कोणत्या पद्धतीने सांगितल्यास ती श्रोत्यांपर्यंत अधिक दमदारपणे पोहचेल याचा कला मी माझ्या आजीकडून शिकलो आहे. त्याच ज्ञानाचा वापर मी ‘कहानी’ प्रेक्षकांपुढे मांडताना केला. दर्जेदार संहितेकडे माझा कल असतो, अशी संहिता मिळाल्यास कहानीचा सिक्वेल बनवणार असल्याचे दिग्दर्शक सूजॉय घोष यांनी सांगितले.
फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) तर्फे आज `कहानी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यानंतर अनौपचारीक गप्पा मारताना घोष बोलत होते. कोणत्याही चित्रपटाची कथा सांगताना प्रेक्षक तिच्याशी कनेक्ट होणे महत्वाचे असते. कहानीचा काही भाग डॉक्युमेंटरी झाल्यासारखा वाटतो कारण मी माझ्या चित्रपटातील सर्व कॅरेक्टरना त्यांच्या हलचाली करण्यास स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्या मुव्हमेंटप्रमाणे मी त्यांना कॅमेर्यात कैद केले.
कोलकता शहराला एक कॅरेक्टर म्हणुन सादर करणे हेच माझ्यापुढे मोठे आव्हान होते असे सांगताना घोष म्हणाले, विद्यासोबत काम करायचे होते म्हणुनच या चित्रपटाची निर्मिती केली. काही लोकांच्या मते चित्रपटाच्या शेवटाविषयी मी साशंक असल्याचे वाटते; परंतु दिग्दर्शक म्हणुन माझी काही भूमिका होती आणि तीच मी क्लायमॅक्समध्ये चित्रपटाचा सार म्हणुन प्रेक्षकांसमोर सादर केली. प्रेक्षकांसाठी तो शेवटचा शॉट असला तरी माझ्या डोक्यात तो पहिला होता, असे त्यांनी सांगितले.