पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदील

नवी दिल्ली दि. २६ – मृग नक्षत्रानंतरही पावसाने दडी मारल्याने देशभरातील शेतकरी चिंतेत पडला आहे. शेती क्षेत्राचे म्हणजेच शेतकर्‍यांचे नुकसान अटळ असल्याचे दिसत आहे. मागील ३० वर्षातली ही सर्वात भीषण परिस्थिती असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.
 
या उलट जुलै महिन्यात मान्सून पुन्हा वेगाने सक्रीय होईल आणि आपला बॅकलॉग भरून काढेल, असा दावा हवामान खात्याने केला आहे. पण बॅकलॉगचा पाऊस पिकांना किती फायदेशीर ठरेल हे सांगणे कठीण आहे. हवामान खात्याने यापूर्वी पाऊस सर्वसामान्य होईल असा अंदाज वर्तवला होता. या आशेने शेतकरी जोमाने कामाला लागला होता. पण पूर्ण तयारी होऊनही पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याने, शेतकर्‍यांसमोर मोठं संकट निर्माण झाले आहे.

हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अल-निनोचा प्रभाव दिसू लागेल, आणि पावसाचे प्रमाण कमी होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे. म्हणजे यंदा फक्त जुलै महिन्यातच होणार्‍या पावसावर, देशाच्या जनतेला समाधानी रहावे लागणार असल्याचे भाकित हवामान खात्याने केले आहे. याचा थेट फटका खरीप पिकांना बसून उत्पादनावरही होणार आहे.