कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग

बंगलोर, दि.२६ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या समर्थकांची नेतृत्त्व बदलाची सतत होत असलेली मागणी आणि विधानसभेच्या तोंडावर आलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर भाजप हाय कमांडने कर्नाटकात नेतृत्त्व बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानुसार दोन केंद्रीय निरीक्षक बंगलोरला रवाना होत असून तेथे ते आमदार, वरीष्ठ नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्याचा अहवाल भाजप राष्ट्रीय संघटनाकडे सोपविणार आहेत असेही सांगण्यात आले आहे. हे निरीक्षक २८ जूनला बंगलोरला जाणार आहेत. येडियुरप्पा, मुख्यमंत्री सदानंद गौडा, राज्य भाजप अध्यक्ष के.एस ईश्वरप्पा व अन्य वरीष्ठ मंत्र्यांना ते भेटतील.

मागील वेळी मुख्यमंत्री बदलताना गौडा यांची थेट निवड केली गेली होती. यावेळी मात्र मतदानातून ही निवड केली जाणार असल्याचे समजते. नेत्यांची मते लक्षात घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे अहवाल दिला जाणार आहे. गडकरी यांनी येडियुरप्पा यांच्या घरी नुकत्याच पार पडलेल्या विवाहसमारंभातच नेतृत्त्वबदल केला जाईल अशी खात्री दिली होती असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान येडियुरप्पांनी मंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असल्याचेही वृत्त आहे.