राज्यातील सर्व आगारांमध्ये अल्कोहोल तपासणी यंत्र

पुणे, दि. २५ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांनी मद्य प्राशन करून बस चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यशासनाने सर्व एसटी आगाराला अल्कोहोल टेस्ट मशीन पुरविण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले. परंतु आजवर केवळ एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांनाच अल्कोहोल टेस्ट मशीन पुरविण्यात आली आहे. आता मात्र प्रत्येक आगारात हे यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी दिली.

दारू पिऊन वाहने चालविले जात असल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे राज्यशासनाच्या निदर्शनास आले. यात एसटी बसेसने झालेल्या अपघाताची संख्या लक्षात घेता मद्य प्राशन करूनच चालकाने बस चालविल्यामुळे अपघात घडल्याचे चौकशीअंती दिसून आले. कामगिरीवर जाताना चालकाची तपासणी अल्कोहोल टेस्ट मशीनने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु महामंडळाने आजवर विभागीय कार्यालय वगळता एकाही एसटी आगाराला अल्कोहोल टेस्ट मशीन पुरविले नाही. त्यामुळे चालकांची अल्कोहोल टेस्ट न करताच त्यांच्याकडून कामगिरी बजावून घेतल्या जात आहे.

त्यामुळे चालकांची तपासणी न करताच एसटी आगाराचे प्रमुख अधिकारी चालकांना कर्तव्य बजाविण्याची सूचना करीत आहेत. याशिवाय एसटी महामंडळाच्या भरारी पथकाकडेही अल्कोहोल टेस्ट मशीन देऊन प्रवासादरम्यान वाटेतही चालकाची तपासणी करण्याचे निर्देश दिले असले तरी आगाराकडे अल्कोहोल टेस्ट मशीन नसल्यामुळे अंमलबजावणी होत नाही.