धमरा (ओडीशा), दि.२५ – अग्नि क्षेपणास्त्रापेक्षा देशात स्वच्छतागृहांची जास्त गरज आहे, असे मत केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केले. देशात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरविणे आवश्यक आहे. अन्यथा अग्नि क्षेपणास्त्रांचा उपयोग नाही, असेही त्यांनी सांगितले.
बायो टॉयलेटचे नाव ’बापू’ ठेवा- जयराम रमेश
रमेश यांनी ओडीशातील क्षेपणास्त्र चाचणी प्रक्षेपण केंद्राला भेट देऊन पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकुल असलेल्या स्वच्छतागृहांचे अनावरण केले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बायोलॉजीकल स्वच्छतागृहे विकसित केली आहेत. स्वच्छतागृहांच्या समस्येकडे यावेळी रमेश यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, सरकारसमोर सार्वजनिक टॉयलेटस उपलब्ध करण्याची मोठी समस्या आहे. गोरगरीब आणि ग्रामीण भागातील जनतेला अशी सुविधा देणे आवश्यक आहे. देशात स्वच्छतेसाठी महात्मा गांधी स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. त्यामुळे या पर्यावरण मित्र ठरणार्या टॉयलेटला ’बापू’ असे नाव देण्याचा सल्लाही रमेश यांनी दिला. देशाच्या संरक्षणासाठी करण्यात येणार्या तरतुदीएवढीच तरतूद जन कल्याणाच्या उपक्रमांसाठी करण्यात यावी, अशी मागणीही रमेश यांनी केली.
अशा प्रकारचे बायो टॉयलेटस सियाचिन आणि लडाख यासारख्या ठिकाणी असलेल्या सैनिकांसाठी वापरण्यात येतात.
