तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान

पुणे,दि. २५ – कोरडी पडलेली नीरा… पाण्याची डबकी… त्यातच स्नान करणारे वारकरी… ही परिस्थिती आहे पुणे आणि सोलापूरच्या हद्दीवर असलेल्या नीरेच्या पात्रातली. महाराष्ट्रातल्या या दुष्काळाचे चटके साक्षात तुकोबांनाही बसले आहेत. नीरा नदीचे पात्र कोरडं पडल्यामुळे तुकाराम महाराजांच्या पादुकांना चक्क टँकरच्या पाण्याने स्नान घालण्याची पाळी आली.

सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्याची परंपरा आहे. पण पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मोठा पेच उभा राहिला. अखेर नीरेच्या मुख्य पात्रातून दोन टँकर पाणी आणण्यात आले आणि ५१ हंड्यांनी तुकोबांच्या पादुकांना अभिषेक झाला. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला.