ठाकरे विरुद्ध ठाकरे ; अंगावर आले तर शिंगावर घेऊ – उद्धव ठाकरे

राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीत शिवसेनेने काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यावरुन बुधवारी राज ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांना पाठिंबा देणारे विरोधीपक्ष असतात का? असा सवाल उपस्थित केला होता.

महापालिका निवडणूकीत काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत केली जात असल्याची टीका शिवसेनेवर केली होती. त्यांना प्रत्युत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, मनसेचा महापालिका निवडणूकीत झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यामुळेच ते भलते-सलते आरोप करत आहेत.

काँग्रेसचे नेते दिल्लीतून मुंबईत येऊन कोणकोणाला भेटतात याची सगळी माहिती माझ्या कडे असल्याचा दावा राज यांनी केला होता. त्यावर उद्धव म्हणाले, उगाच कोणी तरी कुणाला भेटले असे खोटे आरोप करुन लोकांचे मनोरंजन करु नका, असा सल्ला त्यांनी राज यांना त्यांचे नाव न घेता दिला. मनसे टोलवाल्यांकडून हप्तेघेते असा आरोपही उद्धव यांनी केला.

एनडीएचा घटक पक्ष असतांना शिवसेनेने राष्ट*पतिपदासाठी काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा का दिला, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, मुखर्जी आणि संगमा यांच्या वाटचालीत मुलभूत फरक आहे.

पंतप्रधानपदाच्या एका प्रश्नावर ते म्हणाले, एनडीएने आतापासून त्यादिशेने प्रयत्न सुरु केले पाहिजे. कोणत्या दिशेने जायचे हे ठरविल्या शिवाय पंतप्रधान कोण होणार या प्रश्नाला काहीही अर्थ नाही. शिवसेना ही भाजप सोबतच असल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे अशी अट घातली आहे. यावर नितीशकुमार यांचा समाचार घेत या देशाचा पंतप्रधान हा हिंदूत्ववादीच असला पाहिजे असे ते म्हणाले.