विरार टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन

विरार, दि.२१ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरारजवळील खानिवडे टोलनाक्यावर बुधवारपासून १५ दिवसांच्या आंदोलनास सुरुवात केली. या काळात मनसे कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यांवरून जाणार्‍या प्रत्येक वाहनाची; तसेच त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या पथकराची नोंद ठेवण्यात येणार आहे.

सध्या राज्यभर टोलनाक्यांच्या प्रश्नावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरारजवळील खानिवडे टोलनाक्यावरुन जाणारी वाहने मोजायला सुरवात केली. या दरम्यान टोलनाक्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सकाळपासूनच पोलीस सदर ठिकाणी हजर होते. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, टोलनाक्यावरील वाहनांची मोजणी करण्याचे काम मनसे कार्यकर्ते करीत असून हे आंदोलन १५ दिवस चालणार आहे, अशी माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिली.