राज्यातील दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यास शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील डोर्ली या गावाजवळील बोगद्यामध्ये म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या आलेल्या पाण्याचे पूजन मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पतंगराव कदम हे होते तर, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाचे (जलसंपदा) मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील पाटबंधारे विभागाकडील सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यास ८० हजार कोटी रुपयांची गरज असून सिंचन प्रकल्पाबाबत सध्या मंत्री पातळीवर चर्चा सुरु आहे. सिंचनाचे निकष बदलण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. म्हैसाळ प्रकल्पाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही. जत तालुक्याच्या वेशीवर आज पाणी आल्यामुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हिवरे क्षेत्रात पाणी येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. म्हैसाळ योजना पूर्ण करण्याकरिता अद्यापि १४०० कोटी रुपयांची गरज आहे. निधीची अडचण असली तरी त्यातून मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.
टंचाईग्रस्त भागातील लोकांकरिता पिण्याचे पाणी, जनावरांकरिता चारा डेपो, छावण्या व मागेल त्याला काम देण्याचाही निर्णय घेतला असून अद्यापही म्हणावा तसा पाऊस टंचाईग्रस्त भागात झाला नसल्यामुळे सवलती सुरू ठेवल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले.