वॉशिंग्टन, दि.२० – `ऍप्पल’ या सॉफ्टवेअर कंपनीच्या आयपॅडला आत्तापर्यंत तोड नव्हती. पण, आता टॅबलेटच्या क्षेत्रात घुसून बाजी मारण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा `सुपर’ सज्ज झाला आहे. मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने १०.६ इंचाचा एक टॅबलेट लॉन्च केला आहे. या टॅबलेटचे नाव आहे, `सरफेस’.
`सरफेस’ चे बाजारात दोन मॉडेल्स येणार असून त्यापैकी एक एआरएम प्रोसेसरवर काम करणार आहे. या मॉडेलमध्ये विंडोज ८ ही सॉफ्टवेअर सिस्टीम असेल. याचा वापर मुख्यत: मेट्रो ऍप्लिकेशन वापरण्यासाठी करता येईल. यात एमएस ऑफिस १५ वापरता येणार आहे. एआरएम प्रोसेसरवर काम करणार्या या टॅबलेटची जाडी ९.३ मि.मि. तर वजन फक्त ६७६ ग्रॅम असणार आहे. हा टॅबलेट युएसबी २ ला सपोर्ट करेल. तर दुसरा सरफेस मॉडेल इन्टेल प्रोसेसरवर काम करणार असल्याने हा मॉडेल डेक्सटॉप कम्युटरप्रमाणे सर्वच ऍप्लिकेशनला सपोर्ट करणार असल्याची माहिती कंपनीने दिली.
दुसर्या मॉडेलमध्ये जास्त रेझोल्युशनची स्क्रीन, जास्त क्षमतेची बॅटरी आणि युएसबी ३चा सपोर्ट मिळेल. हा विंडोज ८ प्रोफेशनल या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या मॉडेलची जाडी १३.५ मि.मि. तर वजन ९०३ ग्रॅम असणार आहे. या टॅबलेटचे कीपॅड आणि मल्टीटच ट्रॅकपॅड सोप्या पद्धतीने हाताळता येऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.
दोन्ही टॅबलेटचे हार्डवेअर मँगनिज धातूपासून तयार करण्यात आले आहे. हे टॅबलेट उभे ठेवण्यासाठी खास स्टँडची सोय आहे. त्यामुळे टिव्हीप्रमाणे यात व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
टायपिंगसाठी सरफेसमध्ये दोन पेन दिले जातील. ज्यावेळी हे पेन वापरले जात असतील त्यावेळी सरफेसच्या स्क्रीनवर टच इनपूट काम करणे बंद करेल. त्यामुळेच जर चुकून तुमचे बोट सरफेसच्या स्क्रीनवर पडले तरी त्याचा परिणाम मात्र जाणवणार नाही. टॅबलेटची किंमत मात्र कंपनीने गुलदस्त्यातच ठेवली आहे.
ऍपलच्या आयपॅडकडे संगणकीय क्षेत्रातील एक क्रांती म्हणून पाहिले जाते. आयपॅड टॅबलेट खुप लोकप्रिय झाला असून त्याने मायक्रोसॉफ्टच्या लॅपटॉप बाजारालाही धक्का देण्यास सुरवात केला आहे. तसेच सतत कुठुनही जगाशी कनेक्ट राहण्यासाठी उपयुक्त ठरणार्या टॅबलेटने डेस्कटॉप कम्युटर कधीच मागे पडले आहेत. ऍपल, मायक्रोसॉफ्ट, आणि गुगल सध्या भविष्यातील संगणकीय बाजारावर वर्चस्व गाजवण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. लवकरच गुगल ऑन्ड्रॉइड बेस टॅबलेट बाजारात आणण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.