गिलानींचे राज्य खालसा, सर्वोच्च न्यायालयाने ठरवले अपात्र

इस्लामाबाद, दि. २० – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना दणका दिला आहे. न्यायालयाचा अपमान प्रकरणी गिलानी यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गिलानी २६ एप्रिलपासून अपात्र ठरल्याचे म्हटले आहे.

गिलानी यांना दणका देताना न्यायालयाने अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनाही लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानिक जबाबदारी पार पाडावी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार न्यायालयाने झरदारींना नव्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

गिलानी अपात्र असल्याची अधिसूचना प्रसिद्ध करावी, असे आदेश न्यायालयाने पाकिस्तानच्या मुख्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे गिलानी २६ एप्रिलपासून संसदेचे सदस्य नाहीत.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेज निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यायालयाचा निर्णय सत्ताधारी पीपीपी पक्षाने मान्य केला आहे.  दरम्यान, रात्री पाकिस्तानी पिपल्स पार्टीची बैठक होणार असून त्यात नव्या पंतप्रधानाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीने न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो असे म्हटले आहे. आता नव्या पंतप्रधानाच्या निवडीसाठी पाकिस्तानात जोरदार हलचाली सुरु झाल्या आहेत. पीपीपीचे नेते मखदूम शहाबुद्दीन आणि चौधरी अहमद मुख्तार या दोघांची नावे पंतप्रधानपदासाठी सर्वात वर आहेत. पीपीपी आज रात्री ९ वाजतापर्यंत नव्या पंतप्रधानाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.